हदगाव : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २६ मार्च शेवटची तारीख असतानाही काँग्रेसकडून कोण रिंगणात उतरणार, याची उत्सुकता कायम आहे. दरम्यान, सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या परिने गुप्त भेटीगाठी घेत प्रचाराला सुरुवात केली आहे.हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघ येतो़ माहूर-किनवट, कळमनुरी-हिंगोली, महागाव-उमरखेड, वसमत विधानसभा मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे़ आतापर्यंत मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षाकडे होता़ याच मतदारसंघातून सन २००४-०९ या पाच वर्षामध्ये सूर्यकांता पाटील निवडून ग्रामविकास मंत्री झाल्या होत्या़ परंतु, त्यानंतर शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांनी त्यांचा पराभव करून सन २००९ ला खासदारकी मिळविली़ सन २०१४ मध्ये अॅड़ राजीव सातव यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काँग्रेस पक्षाकडे घेतला व सुभाष वानखेडे यांचा मोदी लाटेतही पराभव केला़सन १९९९-२००४ यावर्षी अॅड़ शिवाजीराव माने हे शिवसेनेकडून विजयी झाले होते़ त्यांनी राष्ट्रवादीच्या सूर्यकांता पाटील यांचा पराभव केला होता़ सन १९९४ ते १९९९ या वर्षातही सूर्यकांता पाटील खासदार होत्या़ या मतदारसंघाचा विचार करता एक टर्मच प्रत्येक पक्षाला विजय मिळाला आहे़
- यावर्षी भाजपा व सेना वेगवेगळे निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा होती. त्यामुळेच अॅड़ शिवाजीराव माने, सूर्यकांता पाटील, सुभाष वानखेडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला व उमेदवारीसाठी प्रयत्न केला़ परंतु, दोन्ही पक्षाची युती झाली व ही जागा शिवसेनेची असल्यामुळे या नेत्यांची गोची झाली़ सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी वर्षापासून फिल्डींग लावली़ अनेकदा त्यांच्या प्रवेशाच्या तारखाही जाहीर झाल्या़ पत्रकार परिषदा घेवून त्यांनी प्रवेश करणार असल्याचे जाहीरही केले़ परंतु स्थानिक शिवसैनिकांनी त्यांना विरोध केल्यामुळे त्यांचा प्रवेश थांबला़ मध्येमध्ये ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या सोशल मीडियावर उठल्या़ अॅड़ शिवाजीराव जाधव यांना शिवसेनेत प्रवेश देवून उमेदवारी देणार असल्याची चर्चा आता थांबली़