नांदेड : शेतकरी कर्जमाफी आणि महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या घटनांवरून भाजपच्यावतीने मंगळवारी राज्यभरात आंदोलने करण्यात आली. तर नांदेड येथे झालेल्या आंदोलनात उपस्थितीत असलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर यावेळी निशाणा साधला. तर सध्याचे सरकार म्हणजे रबरी बाहुला, असल्याचा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला.
दानवे म्हणाले की, राज्यातील महाआघाडीचे अमर, अकबर, अँथनीचे सरकार आहे. यामध्ये तु मोठा की मी मोठा यावरूनच वाद सुरु आहेत. आम्ही हे सरकार पाडणार नाही. परंतु एकमेकांच्या पायात पाय अडकून ते पडले तर आम्हाला दोष देवू नका, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगाविला. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनात ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडणुक निकालानंतर शिवसेनेच्या मनात पाप आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेच्या नेत्यांनी बांधावर जावून हेक्टरी २५ हजार रुपये मिळाले पाहिजेत अशी घोषणा केली होती. परंतु त्यांना आपल्याच घोषणेचा विसर पडला आहे. या सरकारने गेल्या चार महिन्यात नवीन काही केले नाही. फक्त आमच्या सरकारच्या काळातील कामांना स्थगिती देण्याचे काम मात्र अग्रमक्रमाने केले, असल्याचा आरोप दानवे यांनी केला.
तर मराठवाड्यासाठी संजीवनी ठरणारी वॉटरग्रीड योजनाही बंद करण्याच्या तयारीत हे सरकार आहे. मुंबईतील मेट्रो, कोस्टल रोड ही कामे आम्ही सुरु केली. परंतु सरकारने त्यामध्ये खीळ घालण्याचा प्रयल केला आहे. भाजपाच्या काळात केंद्राने कापूसाची नुकसान भरपाई दिली नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने स्वताहाच्या तिजोरीतून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला. सध्याचे सरकार म्हणजे रबरी बाहुला आहे. आंधळ्या या सरकारला जनता दिसत नसल्याचा आरोपही दानवे यांनी यावेळी केला.