नांदेड : ग्राहकास त्रुटीची सेवा देऊन मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरुन ग्राहक मंचाने आयटीआय परिसरातील गोकुल व्हेज रेस्टॉरंटला भरपाई म्हणून २ हजार रुपये व दावा खर्चाबद्दल १ हजार रुपये ३० दिवसांच्या आत द्यावेत, असा आदेश दिला आहे.
पंकजनगर, नांदेड येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी रघुनाथ ओढणे यांनी ४ जून २०१९ रोजी घरी खाण्यासाठी म्हणून तीन आईस्क्रीम गोकुल व्हेज रेस्टॉरंटकडून खरेदी केले होते. आईस्क्रीमची किंमत सर्व करासह २० रुपये होती. तसे आईस्क्रीमच्या कव्हरवर नमूदही होते. मात्र ‘गोकुल’ने आईस्क्रीमची रक्कम २४ रुपये आकारली. जीएसटीसह एकूण तीन आईस्क्रीमसाठी ओढणे यांना ७६ रुपये बिल दिले. नियमानुसार ६० रुपये घेणे आवश्यक असताना ओढणे यांच्याकडून ७६ बिल घेण्यात आले, म्हणजे १६ रुपये अतिरिक्त घेण्यात आले. वाढीव रक्कम घेऊ नका, ती परत करा, अशी विनंती ओढणे यांनी केली, तेव्हा त्यांना उद्धटपणे उत्तर देऊन अपमानित करण्यात आले.
ओढणे यांनी यासंदर्भात ग्राहकमंचात धाव घेऊन उपरोक्त सर्व बाबी अॅड. एन. के. कल्याणकर यांच्यामार्फत मंचाच्या निदर्शनास आणून देऊन मानसिक व शारीरिक त्रासापोटी ५० हजार रुपये, खर्चापोटी १० हजार रुपये द्यावेत, अशी मागणी केली. मात्र गोकुलच्या वतीने बाजू मांडणारे अॅड. ओंकार कुर्तडीकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावत अर्जदाराची तक्रार खोटी आहे. अर्जदाराने सदर आईस्क्रीम घरी खाण्यासाठी नव्हे तर उपाहारगृहात खाण्यासाठी मागविले होते व आईस्क्रीमची किंमत सर्व करासह २० रुपये आहे, हे खोटे आहे. त्यांनी लावलेली किंमत बरोबर आहे. जास्तीचे घेतलेले १६ रुपये परत मागण्यासाठी अर्जदार कधीही गेले नाहीत, असा युक्तिवाद केला.
सेवेत त्रुटी, मानसिक त्रासाबद्दल दंडतक्रारीत दाखल कागदपत्रांवरुन ग्राहक मंचचे अध्यक्ष किशोरकुमार देवसरकर, सदस्य रवींद्र बिलोलीकर, सदस्या कविता देशमुख यांनी निकाल दिला. गोकुल व्हेज रेस्टॉरंटने अर्जदारास १६ रुपये परत द्यावेत, सेवेत त्रुटी, मानसिक त्रास दिल्याबद्दल भरपाईपोटी २ हजार रुपये व दावा खर्चाबद्दल १ हजार रुपये निकाल लागल्यापासून ३० दिवसांत द्यावेत, असा आदेश दिला.