लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिल्हा मध्यवर्ती बँकेत डिसेंबरमध्ये चोरी झाली होती़ या घटनेत चोरट्यांनी बँकेची तिजोरीच लांबविली होती़ ही तिजोरी रविवारी उमरी परिसरात सापडली़ पोलिसांनी ही तिजोरी जप्त केली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे़जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या हणेगाव शाखेत २४ डिसेंबर रोजी चोरी झाली होती़ या घटनेत चोरट्यांनी बँकेतील तिजोरीच पळविली होती़ तिजोरीत पाच हजार रुपये होते़ यावेळी चोरट्यांनी पैसे न मिळाल्याने बँकेतील कागदपत्रे अस्ताव्यस्त करुन बाहेर फेकली होती़ जिल्हा मध्यवर्ती बँकेची हणेगाव शाखा सध्या बंद असून बँकेतून व्यवहारही करण्यात येत नाहीत़ त्यामुळे या ठिकाणाहून चोरट्यांना काहीच हाती लागले नव्हते़ या प्रकरणात मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ दरम्यान, रविवारी सकाळी ११ वाजता पोलिसांना या तिजोरीबाबत गोपनीय माहिती मिळाली़त्यानंतर पोनि़एस़ एस़ शेळके, पोउपनि खेडकर, पोहेकॉ़ कात्रे, ढोले, चुकेवाड हे उमरी परिसरात गेले़ या ठिकाणी समाजकल्याण वसतिगृहाच्या शेजारी एका झुडुपात पोलिसांना ही तिजोरी आढळली़ गोदरेज कंपनीची जवळपास दीडशे किलो वजनाची तिजोरी फोडण्यात चोरट्यांना यश आले नसल्यामुळे ती झुडुपात टाकून देण्यात आली होती़ सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनानुसार तिजोरी जप्त करण्यात आली़ सदरील तिजोरी हणेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची असल्याचे स्पष्ट करण्यात आले़ दरोडेखोरांनी तिजोरी उमरी परिसरात आणून टाकल्यामुळे तेही याच परिसरातील असावेत या दृष्टीने पोलिसांनी शोध सुरु केला आहे़
हणेगाव बँकेत दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 11:40 PM