देगलूर : कर्नाटकात जाणाऱ्या आठ ट्रकला देगलूरच्या महसूल पथकाने सोमवारी रात्री पकडले.ट्रकला महसूल विभागाने पकडल्याची चर्चा होत असतानाच मंगळवारी सकाळपासूनच विनारॉयल्टी तसेच ओव्हरलोडच्या शेकडो ट्रक तहसील कार्यालयासमोरुनच कर्नाटकात जात आहेत. त्यामुळे सोमवारी रात्री झालेली कारवाई केवळ फार्स होता हे आता स्पष्ट झाले आहे.सोमवारी रात्री दहाच्या सुमारास नायब तहसीलदार वसंत नरवाडे, मंडळ अधिकारी इजपवार, तलाठी पडकोंडे, दुधभाते, सरफराज, पाटील आदींच्या महसूल पथकाने देगलूरमार्गे कर्नाटकात जात असलेले आठ ट्रक पकडले. त्यात देगलूर तालुक्यातील सांगवी व बिलोली तालुक्यातील माचनूर, गंजगाव घाटावरुन भरलेले वाळूचे ट्रक आहेत.नगरपरिषदेसमोर हाणामारीट्रक पास करणारे व ट्रकला टोकन देण्यासाठी अनेक जण दिवस -रात्र देगलूरच्या मुख्य मार्गावर कार्यरत असतात. देगलूर नगरपरिषदेसमोर मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एका युवकास बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. परिणामी कर्नाटकात जाणारे ट्रक खानापूर फाटा ते बागनटाकळीदरम्यान थांबविण्यात आले होते. हे प्रकरण शांत झाल्यानंतर रांगा लावून ट्रक कर्नाटकात पास करण्यात आले.‘अवैध रेती वाहतूक तात्काळ थांबवा’देगलूर तालुक्यातील तमलूर, सांगवी, मदनकेलूर येथून सीमेलगत असलेल्या तेलंगणा, कर्नाटकात होणारी अवैध वाळू वाहतूक थांबविण्यात यावी अन्यथा या विरोधात मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा भाजपाचे नगरसेवक प्रशांत दासरवार यांनी दिला.गेल्या अनेक दिवसांपासून वाळू उत्खननाची मर्यादा संपूनदेखील, नदीपात्रातील उत्खनन थांबविण्यात आले नाही. याउलट खुलेआम जेसीबीच्या सहाय्याने क्षमतेपेक्षा जास्त उत्खनन करून मोठ्या प्रमाणात सीमेवर असलेल्या कर्नाटक व तेलंगणा राज्यात वाळू वाहतूक होत आहे. यावर प्रशासनदेखील मूग गिळून गप्प आहे. परराज्यात पाठविण्यावर बंदी असतानादेखील हा व्यापार जोरदार चालत असल्याने तालुक्यातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाळूमाफियाकडून बंदीला हरताळ फासण्यात येत आहे. देगलूर तालुक्यातील तमलूर, मेदनकल्लूर, सांगवी आणि शेजारील तालुक्यांतील बोळेगाव, येजगी येथून रात्रीच्या उत्खननास बंदी असूनही क्षमतेपेक्षा जास्त दिवसरात्र वाळू उत्खनन होत आहे. यामुळे रस्त्यांचे तीन-तेरा वाजले. देगलूर शहराच्या मुख्य मार्गावरून व विशेष म्हणजे, तहसील कार्यालयासमोरून सर्रासपणे शेजारील कर्नाटक राज्यात वाहतूक होत असतानाही अधिकारी मात्र डोळ्यावर पट्टी झाकल्यागत वागणूक देत आहेत.याबद्दल अनेकवेळा नागरिकांनी संबंधित अधिकाºयास तक्रार देऊनही उडवाउडवीची भाषा प्रशासनाकडून वारंवार करत असल्याने येथील नागरिकांत संताप निर्माण झाला आहे. नागरिकांना चढ्या भावात रेती घ्यावी लागत आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे.मंगळवारी शेकडो ट्रक रांगेत कर्नाटकात !सोमवारी रात्री आठ ट्रक पकडल्यानंतर किमान मंगळवारी ट्रकची वाहतूक होणार नाही, असा अंदाज होता. तथापि सकाळी तहसील, उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन विनारॉयल्टीच्या ट्रक रांगा लावून कर्नाटकात गेल्या, हे विशेष!ज्या सगरोळी घाटावरुन दररोज किमान दोनशे ट्रक देगलूरमार्गे कर्नाटकात जातात त्या सगरोळी घाटावरील एकही ट्रक महसूल पथकाला का सापडला नाही ? याची चर्चा होत आहे. याबाबत विविध खमंग चर्चा ऐकावयास मिळत आहे.
देगलूरच्या महसूल पथकाने वाळूचे ८ ट्रक पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 12:36 AM