नितेश बनसोडे।श्रीक्षेत्र माहूर : अंगणवाडीतील दैनंदिन कामकाज आॅनलाईन झाल्याने कामात पारदर्शकता येणार आहे. बालकांच्या दैनंदिन नोंदी, लसीकरण, गृहभेटी, स्तनदा माता, गरोदर माता व किशोरी मुलींच्या आरोग्याच्या नोंदी तसेच पोषण आहाराचे वाटप आदींच्या विविध १० रजिस्टरमध्ये नोंदी घेणे व त्याची देखभाल करण्याच्या कटकटीपासून अंगणवाडी सेविकांची सुटका होणार आहे.माहूर तालुक्यात १ जूनपासून थेट मोबाईलमध्येच सर्व प्रकारच्या नोंदी घेणे सुरू झाले आहे़ त्यामुळे तालुक्यातील अंगणवाडी सेविकाही हायटेक झाल्या आहेत. अंगणवाडीसेविका दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवत असत. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांचे वजन, उंचीच्या नोंदी रजिस्टरमध्ये घेत असत. आता १ जूनपासून अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन दिला असून त्याद्वारे सर्व दैनंदिन नोंदी व कामाचा आढावा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.अंगणवाडीसेविका पारंपरिक पद्धतीने सर्व माहिती व दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमधील दैनंदिन कामकाजाचा आढावा ठेवण्यात येतो. या सर्व कामाचा अहवाल अंगणवाडी केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागतो. मात्र, यावर आता मात करण्यासाठी बालविकास विभागाने तालुक्यातील १३४ अंगणवाड्या व ४९ मिनी अंगणवाड्यांतील अंगणवाडी सेविकांना १७४ स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. त्याद्वारे सर्व दैनंदिन नोंदी व कामाचा आढावा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.स्मार्टफोन कसा वापरावा याबाबत बालविकास प्रकल्प कार्यालय, माहूरच्या वतीने दोन-दोन दिवसांचे प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा एक टप्पा बाकी आहे. माहूर तालुक्यात अंगणवाड्याचे सहा बिट असून बिटमधील अंगणवाड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा अंगणवाडी पर्यवेक्षिका कार्यरत आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने मोबाईल अॅप विकसित केले आहे. आता माहूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना या अॅपद्वारे सर्व कामे आॅनलाईन करता येणार आहे. तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन योग्य पद्धतीने वापर करून जबाबदारीने काम करण्याच्या सूचना बालविकास प्रकल्प अधिकारी विशालसिंह चौहान यांनी दिल्या आहेत.१७४ सेविकांना दिले स्मार्टफोनमाहूर तालुका हा अतिदुर्गम भाग असून काही ठिकाणी अवघड रस्ते व वाहतुकीची अडचण असल्याने अहवाल वेळेत सादर करण्यास अडचण येत असते़ या स्मार्टफोनच्या सहाय्याने विकसित केलेल्या अॅपद्वारे काम सहज व वेळेत होणार आहे. आॅनलाईन प्रक्रियेमुळे वेळेची बचत होणार असून याबाबतची माहिती तालुका ते राज्यपर्यंत पाहता येणार आहे. माहूर तालुक्यातील १७४ अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्यात आले आहे.माहूर तालुक्यातील १७४ अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्यात आले असून त्याद्वारे सर्व नोंदी व कामाचा आढावा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यामुळे बोगस लाभार्थ्यांवर आळा बसेल आणि खऱ्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी विशालसिंह चौहान यांनी दिली़
माहुरात अंगणवाडीतील दैनंदिन कामकाज झाले आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:32 AM