तालुक्यात गुरुवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. सायंकाळच्या सुमारास जोराचा वारा आणि विजा सुरू झाल्या. तसेच तुरळक पावसाने हजेरीदेखील लावली. मात्र, आता पाऊस नको नाही तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त होऊन जाईल. त्यामुळे अवकाळी पावसाची शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. वादळी वाऱ्यासह जाेरदार पावसाने रबीतील गहू, हरभरा, ज्वारी, या पिकांचे खूप माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आंब्याचा माेहरदेखील गळून पडल्याने आंबा उत्पादकांचे देखील नुकसान झाले आहे.
दाेन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरणासह थंडीदेखील वाढली हाेती. शेतकरी अगाेदरच मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी, काेराेना आणि आता अवकाळी पावसासह गारपिटीमुळे हवालदिल झाला आहे. जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे इथल्या शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे माणसांसह पशू-पक्ष्यांचीही तारांबळ उडाली आहे.