दक्षिण मध्य रेल्वेने नेहमीच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ प्राप्त व्हावी याकरिता सतत प्रयत्न करीत असते. या प्रयत्नात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ५ जानेवारी रोजी दक्षिण मध्य रेल्वेने महाराष्ट्रातून पहिली किसान रेल्वे सुरू केली. कांद्याने भरलेला प्रारंभिक रॅक नांदेड विभागातील नगरसोल ते गुवाहाटीपर्यंत नेण्यात आला. नांदेड विभागातील ही पहिली किसान रेल्वे आहे.
कृषी क्षेत्राच्या मार्केटिंगकरिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालविण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ऑपरेशन ग्रीन्स-टॉप टू टोटलअंतर्गत किसान रेल गाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने दक्षिण मध्य रेल्वेच्या महाराष्ट्रातील प्रथम किसान रेल्वेलाही कांद्याच्या वाहतुकीसाठी ५० टक्के दर सवलत देण्यात आली आहे.
नांदेड विभागातील पहिली किसान रेल्वे ५ जानेवारी रोजी नगरसोल स्थानकाहून फलाट क्र. १ वरून सायंकाळी ५.३० वाजता निघाली. या किसान रेल्वेमध्ये प्रत्येकी २३ टन क्षमतेच्या २२ पार्सल व्हॅन आहेत. ही गाडी ५० तासांच्या अल्प कालावधीत २५०० कि.मी. अंतर पार करून सुमारे ५२२ टन कांद्याचा माल घेऊन ७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता गुवाहाटी गुड्स कॉम्प्लेक्सवर, आसाममध्ये पोहोचेल.
चौकट
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी नगरसोल स्थानकातून यशस्वीपणे किसान रेल सुरू करण्याकरिता केलेल्या प्रयत्नाबद्दल दमरेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी आनंद व्यक्त केला. किसान विशेष रेल्वेकरिता अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या विशेष सवलती, संधी आणि सुविधा वापरून आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा, तसेच दक्षिण मध्य रेल्वेची मालवाहतूक वाढविण्यात हातभार लावावा, असे आवाहन केले.