मालेगाव : विकासकामांसाठी आलेल्या निधीचा विनियोग चांगल्या पद्धतीने केल्यास काम दर्जेदार होण्यास मदत होते. ग्रामीण भागातील उच्च शिक्षित सरपंचाने गावातील ग्रामपंचायत, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा डिजिटल व हायटेक केली आहे.
अर्धापूर तालुक्यातील डौर येथे ग्रामपंचायतीचा कार्यभार पेशाने डॉक्टर असलेल्या डॉ. मनोजकुमार रामचंद्र राठोड यांनी तीन वर्षांपूर्वी स्वीकारला. ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या मदतीने गावात शासकीय योजनांतून विविध विकासकामे केली आहेत. त्यात अनेक वर्षांनंतर ग्रामपंचायतीचे सुशोभीकरण करीत ती हायटेक करण्यात आली. विशेष म्हणजे अंगणवाडी ही डिजिटल झाली असून, ग्रामविकास योजनेमधून आजघडीला व अंगणवाडीत बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षण सुलभ होण्यासाठी भिंतीवर बोलकी चित्रे रेखाटण्यात आली आहेत. शिवाय डिजिटल बोर्ड, शैक्षणिक साहित्य, पोषण आहारासाठी स्वतंत्र, सुसज्ज अशी किचन रूम तयार करण्यात आली आहे.
गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही दर्जेदार शिक्षण देण्यात येते. यासाठी उपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्धापूर तालुक्यातील डौर येथील अंगणवाडी आयएसओ मानांकनासाठी निश्चित पात्र होईल, अशा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा सुशोभीकरण करण्यासाठी गटविकास अधिकारी मीना रावताले यांचे मार्गदर्शन मिळाले. ग्रामीण भागातील एका छोट्याशा गावाची डिजिटल आणि हायटेक होण्याकडे वाटचाल सुरू आहे.
यासाठी उपसरपंच राधा आढाव, ग्रामपंचायत सदस्या अनुराधा जाधव, मीरा शिंदे, रुक्मिणबाई मादीलवार, गणपती सूर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अनुराधा जाधव, आदित्य राठोड, ग्रामविकास अधिकारी सुरेश पत्रे, अंगणवाडी सेविका चंदाबाई शातलवार, कमलाबाई राठोड, मदतनीस मीरा राठोड, सहशिक्षक जी. पी.सुकुनगे, राजेश आढाव व सर्व ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले.
कोट
गावाचा कायापालट हा ग्रामस्थांमुळे होत असतो. गावच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना व निधी उपलब्ध आहे. त्यासाठी पाठपुरावा व योग्य समन्वय घडून आल्यास निश्चित गावाचा विकास होतो -डॉ. मनोजकुमार रामचंद्र राठोड
सरपंच ग्रामपंचायत, डौर