मुख्याध्यापक निलंबित
हदगाव : माळझरा, ता. हदगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बालाजी बिडला यांना विविध आरोपावरून निलंबित करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी के. व्ही. फोले यांनी ही कारवाई केली. शिक्षकांचे विमा हप्ते वेळेत न भरणे, अभिलेखे पूर्ण न ठेवणे, शालेय पोषण आहाराचे धान्य वाटप न करणे आदी आरोप मुख्याध्यापकांवर ठेवण्यात आले होते.
नुकसानीचे पंचनामे करा
अर्धापूर : जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनावर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, साईनाथ रामगीरवार, शिवदास बारसे, ज्ञानेश्वर कपाटे, रवि पवार, अनिकेत आवरदे, गजानन जीनेवाड, दिगंबर भोकरे, जीवन कपाटे, नारायण कदम, राजू बारसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
चाऱ्यांचे बियाणे वाटप
किनवट : जनावरांच्या चाऱ्यासाठी शासनाच्या एमएलडीबी योजनेंतर्गत शिवणी, झळकवाडी, तल्हारी येथील आदिवासी शेतकऱ्यांना चाऱ्यांच्या बियाणांचे वाटप करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिरासे व अन्य उपस्थित होते.
नरसीला बामणीकर रुजू
नरसीफाटा : येथील नूतन तलाठी म्हणून तात्याराव बामणीकर रुजू झाले आहेत. ते उदगीर तालुक्यातील बामणी येथील रहिवासी आहेत. पदवीधर अंशकालीन कर्मचारी कोट्यातून वयाच्या ५१व्या वर्षी ते शासकीय नोकरीत रुजू झाले होते. मागील दोन वर्षे मरवाळी तांड्याचे तलाठी श्याम मुंडे अतिरिक्त कारभार पाहत होते.
देगलूरला राष्ट्रवादीच्या वतीने फेरी
देगलूर : कोकण व अन्य ठिकाणी पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना मदतीसाठी देगलूर येथे राष्ट्रवादीच्या वतीने मदतफेरी काढण्यात आली. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश देशमुख, व्यापारी आघाडीचे मधुकर नारलावार, लक्ष्मीकांत पदमावार, जिल्हा चिटणीस ॲड. विलायतअली काझी, तालुकाध्यक्ष ॲड. अंकुश देसाई, बालाजीराव रोयलावार, नंदकिशोर रेखावार, शहराध्यक्ष आसीफ पटेल, नगरसेवक अविनाश निलमवार, बिस्मिल्ला कुरेशी, तुळशीराम संगमवार, रामचंद्र मैलागिरे, संजय चिन्नमवार, दत्तू जोशी, राजू माळेगावकर, लक्ष्मण कंधारकर आदी सहभागी होते.
पोलीसपाटील संघटनेची कार्यकारिणी
हदगाव : तालुका पोलीसपाटील संघटनेच्या अध्यक्षपदी अंबाळा येथील सुभाष पवार यांची, तर उपाध्यक्षपदी चिकाळा येथील दत्ता चंदनवार यांची निवड झाली. जिल्हाध्यक्ष भास्कर पाटील, मराठवाडा उपाध्यक्ष शंकरराव शिरसीकर, शिवाजी जोगदंड आदी यावेळी उपस्थित होते.