नांदेड : धर्माबाद तालुक्यातील चिकना येथे तंबाखूच्या भट्टीत पाय घसरून पडल्याने पिता- पुत्राचा भाजून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. सकाळपासून शेतात गेल्यानंतरही सायंकाळपर्यंत परत न आल्याने कुटुंबियांनी शेतात धाव घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली़
धर्माबाद तालुक्यातील सीमावर्ती भागात अनेक शेतकरी तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. तंबाखू पिकास धूर देण्याची पद्धत आहे़ तंबाखू परिपक्व करण्यासाठी त्याला धूरावर भाजले जाते. यासाठी लाकडाचा एक बंदिस्त मंडप तयार करुन त्यामध्ये आग पेटवून तंबाखूला धूरी देण्यात येते.
सोमवारी सकाळी चिकना येथील शेख चाँद पाशा खाजामियॉ (वय ५५) व त्यांचा मुलगा वंशजचाँद पाशा (२२) हे दोघे शेतात तंबाखूला धूर देण्यासाठी गेले होते़ दरम्यान, पाय घसरुन ते दोघेही भट्टीत पडले़ यात ते भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ सकाळी शेतात गेलेले पिता-पुत्र सायंकाळपर्यंत परत न आल्याने कुटुंबियांनी शेतात जावून पाहणी केली असता, तंबाखूच्या भट्टीत त्यांचे मृतदेह आढळून आले़ दोन्ही मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले होते
याबाबतची माहिती धर्माबादचे पोनि़भागवत जायभाये यांना देण्यात आली़ त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली़ या घटनेमुळे चिकना गावावर शोककळा पसरली होती़