- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड): मुदखेड तालुक्यातील मेंढका येथील कोरेबैनवाड कुटुंबियांनी अहोरात्र कष्ट घेत प्रगती करून दाखवली. समाजाला कायम दिशा देण्याचे काम या कुटूंबाने केले. पण पहिल्या दुःखद घटनेतून सावरत नाही, तोच दुसरा निरोप येतो अन् या दोन्ही घटनांच्या भावनांना वाट मोकळी होण्यापूर्वीच तिसऱ्यांदाही तशीच बातमी येते. वेळ आली की, प्रत्येकाला जगाचा निरोप घ्यावाच लागतो पण, एकाच कुटुंबातील तिघांचा १० महिन्यात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कोरेबैनवाड कुटुंबीयांसोबत घडली.
दि.१९ ऑक्टोंबर २०२१ रोजी लक्ष्मणराव कोरेबैनवाड यांचे कोरोनाने निधन झाले. कर्ता पुरुष गेल्याच्या दुखातून कोरेबैनवाड कुटुंब कसेबसे सावरले होते. दरम्यान, सहा महिन्यानंतर दि.१६ एप्रिल २०२२ रोजी नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रंजनाबाई आणि कृष्णा यांचा अपघात झाला. यात रंजनाबाई यांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी कृष्णावर नांदेड, हैदराबाद, पुणे येथे उपचार करण्यात आले. उपचारासाठी शेत, जमीन विकली, अनेक मदतीचे हात समोर आले होते. मात्र, तब्बल अर्धा कोटी रुपये खर्च करूनही चार महिन्यांचा प्रदीर्घ उपचारानंतर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या कृष्णाची झुंज अपयशी ठरली. १५ ऑगस्ट रोजी त्याची प्राणज्योत मावळली. कृष्णाच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबातील चौघांपैकी तिघांचे निधन झाल्याने एकटा पडलेला धाकटा मुलगा गंगाराम उर्फ गुरू वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आईच्या निधनाची वार्ता माहिती नव्हतीअपघातात जखमी झालेल्या कृष्णाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला आईचा मृत्यू झाल्याचे माहिती दिली नाही. तो आईच्या अंत्यदर्शनालाही मुकला. या परिस्थितीत उपचारादरम्यान काळजावर दगड ठेवून छोटा भाऊ गुरु हा कृष्णाची प्रकृती सुधारावी यासाठी परिस्थितीशी दोन हात करत होता. पण प्रदिर्घ उपचारादरम्यान कृष्णाचे निधन झाले.