इस्लापूर : महिन्याच्या दुसऱ्या शनिवारनिमित्त सुटी असल्यामुळे रेल्वेचे कर्मचारी किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील सहस्त्रकुंड धबधब्यावर गेले होते़ यावेळी जेवणाचे ताट धुण्यासाठी गेलेल्या रेल्वे अधीक्षकांचा पाय घसरुन ते धबधब्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली़गोविंद गोपाळराव बसवंते (वय ५०) असे मयत अधीक्षकाचे नाव आहे़ ते मुगट येथील रहिवासी होते. १२ जानेवारी रोजी कार्यालयाला सुटी असल्यामुळे रेल्वे खात्याचे कर्मचारी व्ही़एम़ पाटील, कट्टा राजू, गौतम, जयपाल लोखंडे, राजीव, शशिकांत गोपनारायण, देवीदास कटीया आदींसह गोविंद बसवंते हे सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी गेले होते़ धबधब्यावर बराच वेळ थांबल्यानंतर सर्वांनी एकत्र जेवण आटोपले़ जेवणानंतर ताट धुण्यासाठी बसवंते जात असताना त्यांचा पाय घसरून पाण्यात पडले़ही घटना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली़ ही बाब इतर सहका-यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली़ काही जणांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला़ परंतु, अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते़रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पाण्यात गळ टाकून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला़ यावेळी सपोनि रामेश्वर कायंदे, विठू बोने, जमादार जाधव, तांबारे, गारोळे, कोकणे आदींची उपस्थिती होती़ या प्रकरणात इस्लापूर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
सहस्त्रकुंड धबधब्यात पडून रेल्वे अधीक्षकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:43 AM