नांदेड : माझ्या लेटरपॅडचा दुरुपयोग करून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला. धर्माबाद तालुक्यातील कारेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले, राजकारणाचा स्तर घसरला आहे. एकमेकांच्या जीवावर जाण्याच्या गोष्टी घडत आहेत. राजकारणात विचारसरणी वेगळी असणे समजू शकतो. परंतु त्यातून हिन पातळी आजपर्यंत मी गाठली नव्हती. माझ्या लेटरपॅडचा दुरुपयोग करून मराठा समाजात माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याच्यामागील सूत्रधार कोण आहे? हे शोधून काढा. असे किती पत्र काढतील, हे सांगता येत नाही. आज माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. अशोक चव्हाण कोठे जातात? कोणाला भेटतात? याचा मेटे करा, असे बोलले जाते. परंतु हे जे कोणी करते त्यांना एवढचं सांगायचं अशोक चव्हाणचा जीव गेला तरी हरकत नाही, परंतु चव्हाण तुमच्यासारखा डुप्लीकेट नाही. खोटं बोलून नेतृत्व करण्याची जी चढाओढ तुमच्यात सुरू आहे. आम्हाला काही सांगण्यापेक्षा तुझ्या बहिणीला जाऊन सांग काय बोलायला पाहिजे? असे म्हणत चव्हाण यांनी खासदार प्रतापराव चिखलीकर यांना टोला लगावला.
समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्नज्याअर्थी माझ्या सहीचे बनावट पत्र तयार करण्यात आले आहे, त्याअर्थी पुढील काळात अशाच प्रकारे खोटे दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता दिसून येते. आगामी काळात अनेक निवडणुका असून, राजकीय दृष्ट्या प्रतिमा हनन करण्यासाठी व जनतेत गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने हे बनावट दस्तऐवज तयार केले असावेत, असा संशय आहे. बनावट पत्रे तयार करून विविध समाजात शंका-कुशंका निर्माण करून सामाजिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचाही प्रयत्न असू शकतो. सदर बाबीचे गांभीर्य व त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेता या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
नांदेड अन् मुंबईतही पाळतमुंबई आणि नांदेडमध्ये आपल्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जाते आहे. सदरहू व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून येते. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, असाही गंभीर आरोप अशोक चव्हाण यांनी या तक्रारीत व्यक्त केला आहे.