पायी चालणाऱ्या व्यक्तींना धोका
जिल्ह्यात राज्य व राष्ट्रीय महामार्गांची कामे झाल्याने जवळपास सर्वच रस्ते चांगले झाले आहेत. त्यात अनेक गावांना लागून हायवे गेला आहे. अशा गावात पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पायी शेताकडे अथवा शौचास जाणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वयोवृद्धांनी रस्त्याचे कडेने चालताना तरुणांचा आधार घ्यावा. जेणेकरून एखादे वाहन जवळून सुसाट वेगाने गेले तर तोल जाऊन अपघात होणार नाही.
मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश
नांदेड जिल्ह्यात मागील महिनाभरात झालेल्या अपघातांत तरुण अधिक आहेत. त्यामध्ये धनेगाव परिसरात एकाच दिवशी तीन तरुणांचा अपघातात मृत्यू झाला. त्याचबरोबर दुचाकीने ट्रकला धडक देऊन झालेल्या अपघातातही सर्वाधिक तरुणच आहेत.
या ठिकाणी वाहने हळू चालवा
नांदेड शहरात प्रवेश करणाऱ्या महादेव पिंपळगाव ते सांगवी, धनेगाव कॉर्नर, विद्यापीठ परिसर ते लातूर फाटा या रस्त्यावर अपघात नेहमीच घडतात. त्यामुळे सदर ठिकाणांहून वाहने चालवितांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
लाॅकडाऊनमध्ये अपघात झाले कमी, पण...
लाॅकडाऊनमध्ये अपघातांची संख्या घटली होती. परंतु, कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने नांदेडकरांना सळो की पळो करून सोडले होते. आजपर्यंत १ हजार ९०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
फेब्रुवारी २०२० मध्ये एकाच दिवशी ८ जणांचा मृत्यू
कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वी २२ फेब्रुवारी २०२० रोजी नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी विविध घटनांमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात बाप-लेकाचा बुडून मृत्यू आणि अन्य घटनात ६ जणांचा मृत्यू झाला.