हदगाव (नांदेड): देवदर्शन करून परत येताना गाडी बाजूला थांबविण्यास सांगत मित्राच्या समोरच कर्जबाजारी शेतकऱ्याने तालुक्यातील केदारनाथ येथील तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी घडली. केशवराव पुजारी हंबर्डे (४५, रा. दर्याबाई उमरी ता. हदगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
केशवराज हंबर्डे बुधवारी आपल्या मित्रासोबत केदारनाथ देवदर्शनासाठी गेले होते. परत येताना केदारनाथ तलावाजवळ त्यांनी मित्राला गाडी थांबविण्यास सांगितले. गाडी थांबतच केशवराज पळत सुटले. मित्राला शंका आल्याने त्याने आवाज दिला. मात्र, मागे वळून न पाहत केशवराज यांनी तलावात उडी घेतली. सोबतच्या मित्रा पोहता येत नव्हते. त्याने आरडाओरडा केला मात्र जमलेल्या नागरीकानंही पोहता येत नव्हते. काही वेळाने गावातून इतर नागरिकांनी तलावात उडी घेत बचावाचा प्रयत्न केला. तोपर्यंत त्यांच्या मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुली, १ मूलगा असा परिवार आहे.
डोक्यावर कर्ज असल्याने केली आत्महत्याकेशवराज हंबर्डे यांच्या डोक्यावर खाजगी सावकाराचे कर्ज आहे. काही दिवसांपूर्वी जमीन विकून त्यांनी पैसे जमा केले. मात्र, तरीही मुद्दल रक्कम तशीच आहे. अल्प शेतीत उत्पन्न नाही, यातच पत्नीचे आजारपण यासाठी पैसे लागतात. यामुळे नैराश्यातून केशवराज यांनी आत्महत्या केली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.