नांदेड : शहरातील डॉक्टरलेन परिसरातील एसबीआय बँकेचे एटीएम फोडल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीची ओळख पटविली असून त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध करुन त्याच्या संदर्भात माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले.
डॉक्टरलेन परिसरात ३१ डिसेंबर २०१७ च्या मध्यरात्री एसबीआयचे एटीएम चोरट्यांनी फोडले होते. या प्रकरणी वजिराबाद ठाण्यात बँकेचे मुख्य प्रबंधक अमरीश देशपांडे यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅम-याची रेकॉर्डींग तपासली. त्यामध्ये चोरट्याने तोंडाला रुमाल बांधून दगडाने एटीएम फोडल्याचे स्पष्ट दिसत होते. तपासा अंती या चोरट्याची ओळखही पोलिसांनी पटविली आहे.
पोलिसांनी वरील चोरट्याची काही माहिती असल्यास नागरिकांनी वजिराबाद ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन वजिराबाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण पठारे यांनी केले आहे. त्याचे छायाचित्रही पोलिसांनी सोशल मीडियावर टाकले आहे. या चोरट्याचा पोलीस कसून शोध घेत असून इतर ठिकाणी घडलेल्या अशा एटीएम फोडलेल्या प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. डॉक्टरलेन परिसरातील एटीएम फोडण्याच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पुढे आले आहे.