या प्रकल्पामध्ये शुद्ध केलेले पाणी शेती, उद्याने, सांडपाणी तसेच बांधकामासाठीही वापरता येणार आहे. परिणामी, उपराेक्त बाबींसाठी महापालिकेच्या वापरात येणाऱ्या शुद्ध पाण्याची बचत हाेणार आहे. पुण्यातील आयडियल सिस्टीम्स अँड सर्व्हिसेसच्या माध्यमातून ही कामे केली जात आहेत.
शहरात विसावा उद्यान येथे १५० केएलडी (१ केएलडी = १००० लिटर) पाणी शुद्ध हाेत आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. यासह अबचलनगर, असर्जन येथेही प्रत्येकी १५० केएलडीचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून, या तीन प्रकल्पांसाठी १ काेटी ६ लाख १३ हजार १९६ रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यासह शनिघाट येथे ८०० केएलडी आणि बाबानगर येथील सावित्रीबाई फुले शाळा येथे २०० केएलडी क्षमतेच्या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. येथे २ काेटी ३९ लाख २५ हजार रुपये खर्च करण्यात येत आहेत.
शहरासह विष्णुपुरी येथील डाॅ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात ४५० केएलडी क्षमतेचे पाच प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. दाेन प्रकल्प कार्यान्वित झाले असून, दाेन प्रकल्पांची कामे पूर्ण झालीत, तर एक प्रकल्पाचे काम सुरू आहे. शहरातील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयातही १०० केएलडी क्षमतेचा मलशुद्धिकरण प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी पालकमंत्री अशाेक चव्हाण यांच्या हस्ते विसावा उद्यान येथील केंद्राचे उद्घाटन सकाळी केले जाणार आहे.
चाैकट....
मराठवाड्यात दुसऱ्या ठिकाणचा प्रकल्प
विकेंद्रीकृत मलशुद्धिकरण प्रकल्पाद्वारे त्या-त्या भागातील घाण पाण्याचे शुद्धिकरण करण्याचा प्रकल्प लातूरमध्ये सुरू करण्यात आला हाेता. त्यानंतर आता विकेंद्रीकृत मलशुद्धिकरण प्रकल्प नांदेडमध्ये सुरू केले आहेत. पहिल्या टप्प्यात ही संख्या कमी असली तरीही शहरातील विविध भागांमध्ये असे प्रकल्प सुरू करून पाण्याची उपलब्धतता केली जाणार असल्याचे आयुक्त डाॅ. सुनील लहाने यांनी सांगितले.