महापालिकेने शहरात राज कॉर्नर, वर्कशॉप कॉर्नर, आयटीआय कॉर्नर, शिवाजीनगर, वजिराबाद चौक, देगलूर नाका, अण्णा भाऊ साठे चौक, आदी ठिकाणी ‘नो बॅनर झोन’ घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत २३ जून २०२१ रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरावही घेतला आहे.
महापालिका हद्दीत वाहतुकीची कोंडी होत असलेल्या ठिकाणी, विविध चौकांमध्ये, फुटपाथवर मोठ्या आकारांचे जाहिरात फलक लावले जात आहे. त्यामुळे वाहतुकीस व पायी चालतानाही अडथळे होत आहेत. त्याच वेळी शहराचेही मोठ्या प्रमाणात विद्रूपीकरण सुरू आहे. राजकीय दबावापोटी कारवाई मात्र होत नाही.
या ठिकाणी कोण लक्ष देणार?
n शहरात तरोडा नाका, छत्रपती चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृतरीत्या बॅनर लावले जातात.
n हे बॅनर महापालिकेच्या पथकाने काढायचा प्रयत्न केल्यास अनेकदा वादही झाले आहेत. राजकीय हस्तक्षेपातून मोठी कारवाईही शक्य होत नाही.
n देगलूर नाका, चौफाळा या भागातही बॅनर लावले जात आहेत. त्याकडेही कानाडोळा होत असल्याचे चित्र सध्या तरी आहे.
सहा महिन्यांपासून कारवाई नाही
कोरोना संकटात व्यस्त असलेल्या महापालिका यंत्रणेने गेले सहा ते आठ महिन्यांत अनधिकृत बॅनर प्रकरणात कारवाई केली नाही.
कारवाईचे स्वरूप बॅनर काढणे इतकेच आहे. त्यातही राजकीय बॅनर असेल तर ते काढताना महापालिकेच्या पथकाला विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई अपेक्षित आहे.
काय होऊ शकते कारवाई?
n शहरात अनधिकृत बॅनर लावणाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध कायदा १९९५मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.
n महापालिका हद्दीमध्ये रहदारीच्या ठिकाणी, चौकामध्ये विनापरवानगी जाहिरात फलक लावून वाहतुकीस व पादचाऱ्यांना अडथळा आणल्यास महापालिकेतर्फे गुन्हे दाखल करण्यात येतील.
अधिकारी म्हणतात...
महापालिकेने ‘नो बॅनर झोन’ घोषित केले आहे. या ठिकाणी बॅनर लावल्यास तत्काळ बॅनर हटवले जात आहेत. सर्वसाधारण सभेतील ठरावाची अंमलबजावणी केली जात आहे. याउपरही बॅनर लागत असतील तर कारवाई केली जाईल.
- अजितपालसिंघ संधू
कर व मूल्यनिर्धारण अधिकारी, महापालिका