देगलूर विधानसभा पोटनिवडणूक: नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मतदान सुरु, ३ वाजेपर्यंत ४८ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 01:06 PM2021-10-30T13:06:22+5:302021-10-30T13:08:04+5:30
Deglur Assembly by-election:या मतदारसंघात एकूण ४१२ मतदार केंद्र स्थापन केले असून, यातील ८ केंद्र संवेदनशील आहेत.
देगलूर ( नांदेड ) : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण ४१२ मतदार केंद्रावर मतदान प्रक्रिया सकाळपासून सुरळीत सुरु झाली आहे. दुपारी 03 वाजेपर्यंत झालेले मतदान 48 . 57 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत पहिल्या 2 तासात 6.13% मतदान झाले होते. या दरम्यान 18500 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला. तर दुपारी 01 वाजेपर्यंत 31.41 टक्के मतदान झाले होते.
विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांवर आज सकाळपासून नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. सकाळी काही ठिकाणी संथ सुरुवात झाली मात्र त्यानंतर मतदानाचा टक्का वाढत जात आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 21.22% मतदान झाल्याची नोंद आहे.
एकूण ४१२ मतदार केंद्र
या मतदारसंघात एकूण ४१२ मतदार केंद्र स्थापन केले असून, यातील ८ केंद्र संवेदनशील आहेत. सर्व केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले असून, १ हजार ६४८ कर्मचारी नियुक्त केले आहेत. तर ८२४ कर्मचारी राखीव आहेत. एकूण 12 उमेदवार रिंगणात, 2 लाख 98 हजार 540 मतदार, 412 केंद्र, 8 संवेदनशील केंद्रे, मतदान केंद्रासाठी दोन्ही डोस घेतलेल्या 1 हजार 677 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, 206 केंद्रावर वेब कॅमेरे द्वारे राहणार लक्ष, 1 हजार 206 बलेट युनिट, 968 कंट्रोल युनिट, 993 व्हीविपट मशीन मतदान प्रक्रियेत आहेत.
कॉंग्रेस-भाजप-वंचित तुल्यबळ लढाई
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे यांचा २२ हजार मतांनी पराभव केला होता. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी ऐनवेळी भाजपमध्ये दाखल होऊन उमेदवारी मिळवली. दोन तुल्यबळ उमेदवार मैदानात असताना वंचित बहुजन आघाडीनेही डॉ. उत्तम इंगोले यांच्या माध्यमातून तगडे आव्हान मतदारसंघात उभे केले आहे.