देगलूर- बिलोली पोटनिवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या; तुल्यबळ लढतीत कोण मारणार बाजी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 06:40 PM2021-10-28T18:40:15+5:302021-10-28T18:42:43+5:30
Deglaur- Biloli by-election: मतदानाला आता दोन दिवस शिल्लक असून, मतदारांच्या गुपचूप भेटी- गाठी घेण्यात येत आहेत.
देगलूर (जि. नांदेड) : देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी सात वाजता थंडावल्या. ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार असून, मतदारांचा कौल २ नाेव्हेंबर रोजी कळणार आहे.
देगलूर- बिलोली मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांच्या उमदेवारांच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात हजेरी लावली. मतदानाला आता दोन दिवस शिल्लक असून, मतदारांच्या गुपचूप भेटी- गाठी घेण्यात येत आहेत. आचारसंहिता भंग होणार नाही, यासाठी सर्वच उमेदवार खबरदारी घेत आहेत.
कॉंग्रेस-भाजप-वंचित तुल्यबळ लढाई
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे यांचा २२ हजार मतांनी पराभव केला होता. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी ऐनवेळी भाजपमध्ये दाखल होऊन उमेदवारी मिळवली. दोन तुल्यबळ उमेदवार मैदानात असताना वंचित बहुजन आघाडीनेही डॉ. उत्तम इंगोले यांच्या माध्यमातून तगडे आव्हान मतदारसंघात उभे केले आहे.
एकूण ४१२ मतदार केंद्र
या मतदारसंघात एकूण ४१२ मतदार केंद्र स्थापन केले असून, यातील ८ केंद्र संवेदनशील आहेत. सर्व केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले असून, १ हजार ६४८ कर्मचारी नियुक्त केले आहेत. तर ८२४ कर्मचारी राखीव आहेत.