देगलूर (नांदेड) : देगलूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत पहिल्याच फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर हे १६२४ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना ४२१६ मते मिळाली. दुसऱ्यास्थानी भाजपचे सुभाष साबणे यांना २५९२ तर वंचित बहुजन आघाडीचे डॉ उत्तम इंगोले यांना ३२० मते मिळाली.
राज्याचे लक्ष असलेल्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी पहाटे आठ वाजता प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत काँग्रेसचे अंतापूरकर हे आघाडीवर असून दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
कॉँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने पोटनिवडणूक झाली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने देगलूरची जागा काँग्रेसला राहिली. त्या ठिकाणी काँग्रेसने दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली. तर, भाजपकडून शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने डॉ. उत्तम इंगोले यांना उमेदवारी दिली. दरम्यान, देगलूरच्या निवडणुकीत महाविकास आघाडीविरोधात भाजप असेच चित्र निर्माण झाले आहे. एकूण 12 उमेदवार निवडणुकीत आहेत. यामुळे वंचित आणि इतर उमेदवार यांच्यात मतांची विभागणी सुद्धा काँग्रेस आणि भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते.