देगलूर : मार्च महिना निम्मा संपला आहे. जसजसा मार्च संपेल तशी उन्हाची तीव्रता वाढणार असून शनिवारी तालुक्याचे तापमान ३९ अंश सेल्सिअस एवढे होते. उकाडा व उन्हाच्या तीव्रतेमुळे गार पाणी पिण्यासाठी माठ, थंड वारा घेण्यासाठी कुलर व उन्हापासून बचाव करण्यासाठी मोठ्या दस्त्या खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.देगलूरचे तापमान शनिवारी ३९ सेल्सिअसपर्यंत पोहोचले. मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्याच्या प्रारंभी तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी एप्रिल व मे महिन्यात ४४ ते ४५ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेले होते. यावर्षी तर सरासरीच्या तुलनेत केवळ ४० टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे यावर्षी तापमानात वाढ होते की काय, याची भीती वाटू लागली आहे.सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे मोठ्या दस्त्या खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेला मातीचा माठ विशेषत: महिला शनिवारच्या आठवडी बाजारात खरेदी करीत असून, माठाची किंमत १५० ते २५० रुपयांपर्यंत आहे. ज्यांच्या घरी फ्रीज आहे, असे नागरिकसुद्धा मातीच्या माठातले पाणी पिण्यास चांगले राहते म्हणून माठ खरेदीला प्राधान्य देत आहेत. त्याचबरोबर जुने कुलर काढून त्याची साफसफाई करणे, वाळा बदलणे तर काही जण नवीन कुलर खरेदी करताना दिसत आहेत. कुलरची विक्री करणारे व्यापारी आपल्या दुकानापुढेच कुलर रस्त्यावर ठेवत आहेत.
हिमायतनगर तालुक्यात तीव्र पाणीटंचाईहिमायतनगर : उन्हाचा पारा वाढल्याने बोअरवेल, विहिरींच्या पाणीपातळीवर मोठा परिणाम झाला आहे.हिमायतनगर तालुक्यातील अनेक भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.तालुक्यात दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने कोरडी दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरले नाही. त्यामुळे पाणीपातळी खोल गेली. तालुक्यातील तिन्ही तलावांत गाळ भरल्याने पाणीसाठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे कालव्याद्वारे नाला, नदीला पाणी सोडणे बंद झाले आहे. त्यामुळे गुराढोरांसाठी पाणीप्रश्न गंभीर बनला असून जंगलातील पाणवठे कोरडे पडल्यामुळे वन्यजीव पाण्यासाठी भटकत आहेत.आता उन्हाचा पारा वाढताच अनेक भागांतील बोअरवेल, विहीर कोरडे पडले तर काही भागातील बाराही महिने चालणारे बोअरवेल आटत आहेत. उपलब्ध विहिरींनी या वर्षी आताच तळ गाठल्याने येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार असल्याची चाहूल दिसत आहे. पुढे उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सिबदरा, धानोरा, सोनारी, सरसम, इंदिरानगर, वडगाव, खैरगाव, आदींसह अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आतापासूनच बैल- गाडीवर टाक्याने पाणी शेतीतून आणावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अधिग्रहण केलेले विहीर, बोअरवेलचा पाणीपातळीवर परिणाम झाला असल्याने येत्या काळात पाणी आटण्याची शक्यता आहे, असे संबंधित गावांतील नागरिकांनी सांगितले आहे.