नांदेड : बांधकाम झाल्यानंतर त्यात निकृष्टपणा आढळल्यास त्याची जबाबदारी संबंधित अभियंत्यावर निश्चित करण्याचा ठराव सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला़ या ठरावामुळे आता जिल्हा परिषदेअंतर्गतची बांधकामे करताना अभियंत्याबरोबरच संबंधित गुत्तेदारालाही अधिकची काळजी घ्यावी लागणार आहे.
सोमवारी उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती समाधान जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली़ या बैठकीत विविध बांधकामांचा आढावा घेण्यात आला़ अनेक ठिकाणी अंगणवाडी इमारत, आरोग्य केंद्र याबरोबरच शाळा, खोल्यांची बांधकामे सुरु आहेत़ यातील काही बांधकामाच्या ठिकाणी इमारतीच्या स्लॅबला उतार न काढल्याने स्लॅबवर पावसाचे पाणी साचते़ पर्यायाने याचा फटका इमारतीला बसतो़ याप्रकरणी संबंधितांना सदस्यांनी धारेवर धरले़ इमारतीवर स्लॅब टाकताना अभियंत्यांनी तेथे उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अशाप्रकारचा निष्काळजीपणा केल्यामुळे होणार्या आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण, असा सवालही सदस्यांनी बैठकीत उपस्थित केला. शेवटी सद्य:स्थितीत सुरु असलेल्या कामांबाबत अशाप्रकारची दिरंगाई सुरु राहिल्यास कामाच्या निकृष्टतेबाबत संबंधित अभियंत्याला जबाबदार धरले जाईल, असा ठराव पुढे आला़ या ठरावाला मान्यता देण्यात आली.