नांदेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरासह ग्रामीण भागालाही गंभीर परिणाम भोगावे लागले. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व मृत्यूच्या प्रमाणाने भयभीत जीवन जगावे लागले. अनेकांना कोरोनाच्या भयाने ग्रासले. मात्र कोरोनाशी लढताना आता गावोगावी आजीबाईंच्या बटव्यातील उपाय समोर येत आहेत. सकाळी उठाल्यानंतर मिठाच्या कोमट पाण्याच्या गुळण्यासोबतच विविध काढ्यांचा वापर घराघरांत वाढला आहे. त्यामुळे आजीबाईंचा बटवा अन् कोरोनाला हटवा, अशी म्हण प्रचलित होऊ लागली आहे.
कोरोना महामारीने संपूर्ण जग त्रस्त झाले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी वेगवेगळे उपाय केले. ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेने शिरकाव केल्यानंतर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवानुसार या महामारीचा सामना करण्यासाठी जुने उपाय पुढे केले. किरकोळ सर्दी, ताप, घसा खवखवणे, डोके दुखणे, अंग दुखणे आदी आजारावर घरच्या घरीच माणसे उपचार करू लागले. यासाठी कुटुंबातील सर्वांत वयोवृद्ध असलेली माणसे पुढाकार घेऊ लागले. विशेषत: आजीबाईच्या बटव्यातील अनेक घरगुती औषधी बाहेर येऊ लागली. त्यामुळे विविध काढे व औषधांना मागणी वाढू लागली.
वातावरणात बदल होत असताना बहुतांश लोकांना सर्दी व खोकल्याचा त्रास होत असतो. अशा वेळी डाॅक्टरांकडे जाण्याआधी घरगुती उपाय करून पाहिले तर त्याचा परिणामही चांगला येतो. त्यासाठी आजीबाईंचा बटवा कारणीभूत ठरू शकतो. खोकला येत असेल किंवा छातीत कफ साठला असेल तर मुठभर फुटाणे खायला द्यावेत, असा सल्ला आजी देते. फुटाणे खाल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये, हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात. कांद्याचे पाणी लहान बाळांना सर्दी व खोकला असेल तर एक छोटा कांदा बारीक चिरून तो कांदा तीन कप पाण्यात उकळत ठेवावा, तो काढा उकळून झाल्यावर अर्धा झाल्यानंतर त्याला पिवळा रंग येतो. त्यात थोडी चवीपुरती साखर घालून तो काढा दिवसातून ३ ते ४ वेळा गरम किंवा कोमट करून बाळाला पाजावा. या काढ्यामुळे छातीत साठलेला कफ उलटी होऊन किंवा जुलाबाद्वारे बाहेर पडतो. असे उपाय आजीबाईच्या बटव्यातून बाहेर येतात.
आजीबाईच्या बटव्यात काय
१. सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर ताजे आलं बारीक करून घ्यावे व त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिळावे. काही वेळाने उकळल्यावर ते पिण्यास द्यावे. आम्ही आजही हा उपाय घरातल्या घरात करतो. त्यामुळे आमच्या कुटुंबातील सर्वांना हा उपाय आवडतो. मागील दोन महिन्यांपासून आम्ही हा काढा पित आहोत. -
२.तुळशीचा पाल्याचा काढा शरीरासाठी खूप पोषक आहे. चार तुळशीचे पाने, तीन लवंगा, दोन वेलदोडे, दालचिनीचे छोटे तुकडे, चार कप पाण्यात उकळावा. पाण्याचा रंग बदलला की त्यात साखर घालून तो काढा पिण्यास द्यावा. या काढ्याचा परिणाम खूप चांगला होतो. तातडीने सर्दी कमी होते. -
३. गरम पाणी किंवा गरम दुधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी, खोकल्यात आराम मिळतो. कोरोना काळात आम्ही घरच्यांना हा काढा सतत पिण्यास दिला. त्यामुळे सर्वांना या काळात सर्दी झाली नाही. तसेच आरोग्यपण सर्वांचे चांगले राहिले. सर्वांनी घरच्या घरी हा उपाय करून बघावा. -
कशाचा काय फायदा
१. ताजी कोंथिबीर चोळून त्याचा वास घेतल्याने शिंका येणे बंद होतात. हा उपाय साधा व सोपा असल्याने ज्यांना शिंकांचा त्रास आहे, त्यांनी ताजी कोंथिबीर चोळून वास घ्यावा. २. हिचकीचा त्रास होत असल्यास १ ते २ चमचे साजूक तूप गरम करून त्याचे सेवन करावे, काही वेळातच हिचकीचा त्रास कमी होतो.
३. कांद्याच्या रसात २ लिंबाचा रस मिसळून प्यायला दिल्यास उलट्या होणे थांबते. तसेच कांद्याचा रस मस्स्यांवर लावल्याने ते बारीक होऊन गळून पडतात.
चौकट- किरकोळ औषधी घेण्यापेक्षा हे आजीबाईंच्या बटव्यातील उपाय केव्हांही चांगले आहेत. आयुर्वेदिक औषधी ही आपल्यासाठी वरदान आहे. त्याचा उपयोग केल्यास शरीरावर कोणतेही साईट इफेक्ट जाणवत नाहीत. त्यामुळे किरकोळ औषधी घेण्यापेक्षा आजीबाईंच्या बटव्यातील औषधी केव्हाही चांगलीच आहे. - डॉ. सय्यद ताहेर, आयुर्वेद तज्ज्ञ. नांदेड