नांदेड : राज्य कामगार विमा योजना रुग्णालय-२ मधील वैद्यकीय अधिकारी राजेशकुमार कासराळीकर यांना ४५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले़ एका कर्मचाऱ्याची सोलापूर जिल्ह्यातून नांदेडला बदली करण्यासाठी कासराळीकर यांन लाचेची मागणी केली होती़ या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़शहरातील कलामंदिर परिसरात राज्य कामगार विमा योजना रुग्णालय-२ आहे़ या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून राजेश कासराळीकर हे आहेत़ तक्रारदार हे सोलापूर शहरातील होडी नाका विकासनगर येथील कार्यालयात आहेत़ त्यांची सोलापूर येथून नांदेड येथील रुग्णालयात कायमस्वरुपी बदली करण्यासाठी कासराळीकर यांनी ४५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली़ २५ व २९ एप्रिल अशी दोन वेळेस पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली़त्यानंतर ३० एप्रिल रोजी शिवाजी महाराज पुतळा परिसरात गायत्री हॉटेलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचला होता़ यावेळी पंचासमक्ष राजेशकुमार कासराळीकर यांनी तक्रारदाराकडून ४५ हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले़या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलिस अधीक्षक संजय लाटकर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि़सुनिता शिंदे, संतोष शेट्टे, दीपक पवार, अंकुश गाडेकर, बोडके यांनी ही कारवाई केली़गेल्या अनेक दिवसापासून तक्रारदार हे सोलापूर जिल्ह्यातून नांदेडला बदली करण्यासाठी प्रयत्न करीत होते़ त्यासाठी त्यांनी कासराळीकर यांची भेट घेतली असता, त्यांनी लाचेची मागणी केली़
बदलीसाठी ४५ हजार लाचेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 12:31 AM