नांदेड- शहरातील विविध कॉलन्यातील सुरू असलेल्या बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याकडे महापालिकचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या बांधकाम साहित्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. तसेच किरकोळ अपघात होत आहे. याकडे लक्ष देवून रस्त्यावरील बांधकाम साहित्यासंदर्भात ठोस पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.
खताच्या दरवाढीने शेतकरी हैराण
नांदेड- खरीप हंगाम तोंडावर येवून ठेपला असताना खताच्या किंमतीत प्रति बॅग ७०० रूपयांनी वाढ झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. केंद्र शासनाने खताच्या किमती कमी करून शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. गतवर्षी खरीप हंगामात हजारो रूपये खर्च करून जगवलेली पिक सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकर्यांच्या हाती पिकांवर केलेला खर्चही पडला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. असे असतानाही रासायनीक खत कंपन्यांनी खताच्या दरात वाढ केली आहे. १२०० रूपयांना मिळणाररी खताची गोणी १९०० रूपयांवर जावून पोहोचली आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.