अवैध वाळूतस्करी
धर्माबाद : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध वाळूतस्करी जोरात सुरू आहे. तालुक्याच्या सीमा वाळू घाटाने वेढलेल्या गोदावरी, मांजरा नदीतून लाल व काळी वाळू मुबलक असते. रेतीघाट बंद असले तरीही बांधकामाच्या ठिकाणी वाळू येतेच कशी, असा प्रश्न आहे. महसूल विभागाला हाताशी धरून काही जण वाळू वाहतूक करीत आहेत.
दुचाकीची चोरी
हदगाव : शहरातील एका घरासमोरून ३० हजार रुपयांची दुचाकी चोरीला गेल्याची घटना १४ जानेवारी रोजी रात्री घडली. पंचायत समितीचे कनिष्ठ सहायक माधव आवळे यांची मोटारसायकल होती. यशवंतनगर येथे घरासमोर त्यांनी ती उभी केली होती. चोरट्यांनी ती लांबविली. हदगाव पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
पांचाळ यांना पुरस्कार
भोकर- येथील पत्रकार बी.आर. पांचाळ यांना राजस्तरीय दर्पणरत्न पुरस्कार जाहीर झाला. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार मिळाल्याबद्दल पांचाळ यांचे अनेकांनी स्वागत केले.
राजूरकर यांचा सत्कार
भोकर : पंचायतराज व अनुसूचित जमाती कल्याण समितीवर निवड झाल्याबद्दल आ. अमर राजूरकर यांचा भोकरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी सत्कार केला. यावेळी जि.प. बांधकाम सभापती संजय बेळगे, प्रवक्ते संतोष पांडागळे, बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील, माजी सभापती नागनाथ घिसेवाड, सुभाष पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी नगरसेवक सुनील गिमेकर यांनी करून आभार मानले. यावेळी संदीप कोंडलवार, विक्रम क्षीरसागर, शफी इनामदार, सना इनामदार, गोविंद मेटकर, सुहास पवार आदी उपस्थित होते.
चार ट्रॅक्टर पकडले
मुखेड : मुखेड तालुक्यातील मुरमाची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडून पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आले. तहसीलदार काशीनाथ पाटील यांनी ही कारवाई केली. तालुक्यात ठिकठिकाणाहून रात्रीच्या वेळी अवैध मुरमाची वाहतूक सुरू आहे. याला संमती कोणाची, असा सवाल केला जात आहे.
रेल्वेचालकाचा सत्कार
उमरी : सिकंदराबाद ते अकोला या इंटरसिटी एक्स्प्रेसचे उमरी स्टेशनवर १४ रोजी दुपारी आगमन झाले. यावेळी रेल्वे चालकाचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य पारसमल दर्डा, पांडुरंग देशमुख गोरठेकर, ओंकार उत्तरवार, रेल्वेस्टेशन अधीक्षक भरतलाल मीना, रेल्वे पोलीस कर्मचारी पी.पी. डफडे, कैलास वाघ, दिगंबर भालेराव आदी उपस्थित होते.
चौकाचे लोकार्पण
मुदखेड : मुदखेड येथे राजे मल्हारराव होळकर चौकाचे लोकार्पण झाले. कार्यक्रमाला नगरसेवक लक्ष्मण देवदे, चेअरमन गणपतराव कदम, कैलास गोडसे, गोविंद न्याहळीकर, देवा पाटील धबडगे, मुन्ना चांडक, गजानन कमळे आदी उपस्थित होते.