लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरात स्वाईन फ्लूसह डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेकडून केलेल्या तोकड्या उपाययोजनांबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आयुक्त लहुराज माळी यांनी आरोग्य विभागाला फैलावर घेतले. त्याचवेळी विरोधी पक्षनेत्या गुरुप्रितकौर सोडी यांनीही या वृत्ताची दखल घेत शहरात तातडीने उपाययोजना करण्याबाबत आयुक्तांना पत्र दिले आहे.शहरात आॅगस्टमध्ये १८ तर सप्टेंबर महिन्यात ९ डेंग्यूचे रुग्ण आढळले. डेंग्यूसाठी आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर हे तीन महिने पोषक असतात. ही बाब माहीत असताना या कालावधीत आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाययोजना होणे आवश्यक होते. मात्र नित्याचाच उपाययोजना सुरु असल्याने शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या उपचार घेणाºया रुग्णांची माहिती महापालिकेला वेळेत कळविणे खाजगी रुग्णालयाला बंधनकारक आहे. मात्र डेंग्यूचा विविध चाचण्या आदी बाबींमध्ये रुग्णांना अडकवून ठेवण्याचे उद्योगही काही रुग्णालयांकडून सुरु आहेत. यातून खाजगी रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची लूटही सुरु असल्याच्या तक्रारी आहेत. ‘लोकमत’ ने या परिस्थितीबाबत बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले. आयुक्त माळी यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेत वैद्यकीय अधिकाºयांना आदेश दिले. त्यांनी शहरातील एकूण परिस्थितीचा आढावाही घेतला. आवश्यक त्या संपूर्ण उपाययोजना करण्याबाबत त्यांनी सांगितले.दरम्यान, बुधवारी शहरातील विविध भागांत धूरफवारणी करण्यात आली. घरोघरी जावून दूषित पाणीही तपासण्यात आले. मनपा हद्दीत सध्या कंटेनर सर्व्हे हाती घेतला असून कुलरमधून पाणी रिकामे करणे, कोरडा दिवस पाळणे आदींबाबत जागृती केली जात आहे. आॅगस्टमध्ये मनपा कार्यक्षेत्रातील ४१ हजार ८१२ घरांना भेटी दिल्यानंतर त्यापैकी २ हजार २८१ ठिकाणी पाणी नमुने दूषित आढळले.शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळले असले तरी भितीदायक परिस्थिती नसल्याचे मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता चव्हाण यांनी सांगितले. डेंग्यू संदर्भातील तपासणी, प्रतिबंधात्मक उपाययोजना दरम्यान असलेला होम इंडेक्स दहा टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर परिस्थिती धोकादायक असते. मात्र शहरातील होम इंडेक्स हा पाच टक्के असल्याचे डॉ. चव्हाण म्हणाल्या.मनपाच्या विरोधी पक्ष नेत्या गुरुप्रितकौर सोडी यांनीही बुधवारी आयुक्त माळी यांना पत्र दिले. शहरातील काही भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत.शहरातील साथरोगांवर आळा घालण्यासाठी खबरदारी घ्यावी. प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘लोकमत’ च्या वृत्तानंतर काही नागरिकांनी जुन्या नांदेडातील एका रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण असल्याची तक्रार बुधवारी महापालिकेकडे केली. महापालिकेच्या पथकाने चौफाळा येथील डॉ.भोपाळे यांच्या रुग्णालयास भेट देवून पाहणी केली. तेथे असलेल्या तीन डेंग्यू संशयित रुग्णांचे रक्तजलनमुने घेतले. हे नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. या रुग्णालयातून दोन रुग्ण उपचारानंतर घरी गेल्याची माहितीही देण्यात आली.