नांदेड : मुद्रांक शुल्क अनुदान वाटपामध्ये अनियमितता केल्याने हदगाव, नायगाव आणि भोकर ग्रामपंचायतीतील तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे़ या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोषारोपासह विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला.
हदगाव येथील तत्कालिन गटविकास अधिकारी एस़एऩधनवे यांनी मुद्रांक शुल्क अनुदान वाटपात अनियमितता केली़ निश्चित केलेली मागणीची यादी आणि जिल्हा परिषदकडे पंचायत विभागाने सादर केलेली यादी या दोन्हीत तफावत दिसून आली़ यादीच्या खात्रीची पडताळणी न करता धनवे यांनी ३१ ग्रामपंचायतींना त्यांनी त्यांची मागणी नसतानाही रक्कम अदा केली़ हे करताना काही ग्रामपंचायतींना जास्तीचा आर्थिक लाभ देण्याच्य उद्देशाने अनियमितता केल्याचे उघड झाल्याने शासकीय निधीचा अपव्यय केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे़ असाच प्रकार भोकर येथील तत्कालिन गटविकास अधिकारी जे़डीग़ोरे यांनीही केला आहे़ ११ ग्रामपंचायतींना त्यांची मागणी नसतानाही जास्त रक्कम अदा करुन निधीचा अपव्यय केल्याचा ठपका ठेवला आहे़ भोकरचे तत्कालिन विस्तार अधिकारी बीक़े़ चव्हाण यांच्याही विभागीय चौकशीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़