सुनील चौरे /हदगाव
विधानसभा निवडणुकीतील ११ पैकी ९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. अनेक दिग्गजांच्या गावात त्यांच्या पक्षाऐवजी विरोधी उमेदवारालाच जादा मतदान झाल्याची माहिती आहे. पक्षांच्या श्रेष्ठींपुढे टेंभा मिरवणार्या नेत्यांना खुद्द त्यांच्या गावातही मताधिक्य मिळवता आले नाही. याचा फटका काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, भाजपला बसला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सूर्यकांता पाटील भाजपात दाखल झाल्या. त्यांनी ठिकठिकाणी प्रचारातही सहभाग नोंदवला. परंतु त्यांच्या वायफना गावात भाजपाला ११७ मते मिळाली. सेनेला सर्वात जास्त ९२५ मते मिळाली. काँग्रेस पक्षाने येथून ६0२ मते पटकाविली. बनचिंचोलीत सेनेला ४२१ मते मिळाली. भाजपाचे सुभाष वानखेडे यांच्या मूळ गावी ल्याहरी येथे भाजपाला १७५, सेनेला ३३0 आणि काँग्रेसला १८६ मते मिळविता आली. जि. प. चे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांच्या चाभरा गावात काँग्रेसला सेनेपेक्षा केवळ ६0 मते अधिक मिळाली. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुहास शिंदे यांच्या मनाठा गावात सेनेला ३६१ मताधिक्य मिळाले. काँग्रेसचे प्रभाकर उंचाडकर यांच्या उंचाडा गावात काँग्रेसला केवळ एका मताचे मताधिक्य मिळाले. येथून सेनेला ४२६, काँग्रेसला ४२७ मते प्राप्त झाली. करमोडी येथेही केवळ एका मताचे मताधिक्य काँग्रेसला मिळाले. येथून सेनेला २९९ तर काँग्रेसला ३00 मते मिळाली. बाभळीचे अनिल पाटील बाभळीकर यांच्या गावात सेनेला ४२ मतांचे मताधिक्य मिळाले. येथून काँग्रेस पिछाडीवर गेली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबूराव पाथरडकर यांच्या पाथरड गावात काँग्रेसला ८६८ तर सेनेला ३२६ मते मिळाली.
हिमायतनगर तालुक्यातील पंडित सिरपल्लीकर यांच्या गावात सेनेला ४३७ मते मिळाली. काँग्रेसला ३४४ मतांवर समाधान मानावे लागले. हरडफ येथील पंजाबराव हरडफकर यांच्या गावात सेनेला ८0६ तर काँग्रेसला ५९७ मते मिळाली. राष्ट्रवादीचे तालंग येथील कार्यकर्त्याच्या गावात पक्षाला केवळ दोन मते मिळाली. व्यंकटेश निर्मल असे कार्यकर्त्याचे नाव आहे. कारखानदार व्यंकटेश लोणे यांच्या गायतोंड, जगापूर गावात भाजपाला केवळ २0 मते मिळाली. राष्ट्रवादीचेच माजी युवक तालुकाध्यक्ष विनायक क्षीरसागर यांच्या कोळी गावात खातेही उघडले नाही. मनसेचे उमेदवार सुरेश सारडा यांना हदगाव शहरातील २0 मतदान केंद्रावर ८६ मते मिळाली. काही मतदान केंद्रांवर त्यांना खातेही उघडता आले नाही.
११ पैकी ४ उमेदवारांना ४ अंकी आकडाही गाठता आला नाही. काँग्रेस व शिवसेना वगळता इतर ९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक घाडगे यांनी दिली. बसपाचे शेख जाकेर चाऊस यांना हदगावमध्ये १३२३, सेनेचे नागेश पाटील यांना आष्टी गावातून १६४८ तर काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर यांना जवळगाव येथे १४१0 मते प्राप्त झाली.
-----
■ निवघा बाजार : हदगाव विधानसभा निवडणुकीत निवघा परिसरात शिवसेनेला जास्त मतदान झाले. निवघा बा. आणि मनुला बु. वगळता परिसरातील सर्वच गावांतून शिवसेना उमेदवाराला आघाडी मिळाल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत आहे. बाबूराव कदम यांच्या गावातून सेनेला सर्वाधिक ७९६ मतांची आघाडी मिळाली. तर निवघा येथे ६३ व मनुला बु. येथे ६६ मताची आघाडी काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली. यामध्ये निवघा बा. शिवसेना १५२१, काँग्रेस १५८४, मनुला-सेना ३३३, काँग्रेस ३९९ तर तळणी - सेना- १३३६, काँग्रेस-१२८१, कोहळी- सेना १0२१, काँग्रेस २२५, शिरड- सेना ११५६, काँग्रेस ६४२, पेवा- सेना- ४९६, काँग्रेस ३१९, मनुला बु.- सेना ३३३, काँग्रेस ३९९, चक्री -सेना ३९७, काँग्रेस २९५, महातळा - सेना ५७0, काँग्रेस १९१, येळंब-सेना-४८८, काँग्रेस-४७७, हस्तरा -सेना ५९५, काँग्रेस ३७५, तर धानोरा रु. सेना- ७५५, काँग्रेस-५१७ असे मतदान मिळाले.