शहरातील कॅनाॅल राेड, माळटेकडी परिसर, मामा चाैक, हस्सापूर राेड, सिडकाे भागातील एमआयडीसी आदी भागांत नागरिकांची लूट हाेत आहे. अनेक लूट प्रकरणांत तर तक्रारीही केल्या जात नसल्याची बाब पुढे आली आहे. शहरातील कॅनाॅल राेडवर सायंकाळ हाेताच तरुणांचे टाेळकी येथे उघड्यावरच मद्य प्राशन करतात. यातून अनेक घटनाही घडल्या आहेत. असाच प्रकार मामा चाैक परिसरातही हाेत असताे. या भागातील हस्सापूर राेडवर तर अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. त्यांचा तपास सुरूच आहे.
पोलिसांकडे ५० ठिकाणांची यादी
जिल्ह्यात घडणाऱ्या लुटीच्या घटना पाहता पाेलिसांनी अशा धाेकादायक भागांची यादी तयार केली आहे. या भागात पाेलीस चाैक्या उभारण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच गस्तही वाढविली जात आहे. जवळपास ५० हून अधिक ठिकाणे पाेलिसांनी निश्चित करत गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यातून काहीअंशी लुटीच्या घटना थांबल्याही आहेत; परंतु काही कालावधी जाताच पुन्हा चाेरटे कार्यरत हाेतात. त्यामुळे अशा धाेकादायक ठिकाणावर कायम बंदाेबस्त ठेवणे आवश्यक आहे.
कॅनाॅल राेड
तराेडा भागातील नव्याने तयार करण्यात आलेला कॅनाॅल राेड चाेरट्यांसाठी कुरण ठरला आहे. एकट्या जाणाऱ्या नागरिकांना अडवून लुटले जाते.
हस्सापूर राेड
शहराबाहेरून जाणारा हस्सापूर राेडही अनेक दिवसांपासून धाेकादायक ठरला आहे. अनेक दुचाकीस्वारांना अडवून लुबाडले जात आहे.
निर्जन स्थळी गस्त वाढविली
स्थानिक गुन्हे शाखेने शहर व जिल्ह्यातील निर्जन स्थळांवर गस्त वाढविली आहे. लुटीच्या घटना कमी झाल्या आहेत.
- द्वारकादास चिखलीकर, पाेलीस निरीक्षक, स्थागुशा