नांदेड - बनावट परिक्षार्थीच्या माध्यमातून सांख्यिकी विभागात नोकरी मिळविणाऱ्या एका सांख्यिकी अधिकाऱ्याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. न्यायमूर्ती एस. एस. खरात यांनी आरोपीला २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. स्पर्धा परीक्षेत बोगस परिक्षार्थी बसवून नोकरी मिळविण्याच्या या प्रकाराचा २०१६मध्ये भांडाफोड झाला होता. त्यानंतर या प्रकरणात आतापर्यंत अनेकांना अटक झाली आहे. सन २००७ ते २०१६पर्यंत हे बोगस भरतीचे प्रकरण सुरु होते. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षकही या गुन्ह्यात आरोपी झाले. परीक्षा देणारे आणि सध्या पोलीस दलात कार्यरत असलेले अनेक अधिकारीही या प्रकरणात अडकले आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने ३७ जणांना पकडले आहे. त्यातील अनेकजण अद्यापही कारागृहात आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मच्छींद्र खाडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. २०१६ मध्ये सांख्यिकी सहाय्यक पदावर नांदेड येथील कार्यालयात रुजू झालेला धीरज जाधव याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली असून, २१ जानेवारी रोजी त्याला न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी डमी उमेदवाराचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.
डमी परिक्षार्थी प्रकरणात सांख्यिकी अधिकाऱ्याला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 4:08 AM