मोफत धान्य वाटप
माहूर - प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य वाटप करण्यात आले. आष्टा तांडा येथील भूमिहीन शेतमजूर तसेच १४५ शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करण्यात आले. यापुढे डिसेंबर ते एप्रिल महिन्यापर्यंत असे धान्य मोफत वाटप करावे, अशी मागणी लाभधारकांनी केली आहे.
कापसावर बोंडअळी
किनवट - किनवट तालुक्यातील ठिकठिकाणी कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वैतागले आहेत. कापसावर लावलेला खर्चही निघाला नाही. अनेक शेतकरी कपासाचे पीक उपटून फेकून देत आहेत. पहिल्या वेचणीचा कापूस ४ हजार रुपये दराने विकावा लागला.
जि.प.ची सभा
नांदेड - नांदेड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ९ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स गुगल मीट या ॲपद्वारे घेण्यात येणार आहे. संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले.
तालुकाध्यक्षपदी राठोड
किनवट - मनसेच्या किनवट तालुकाध्यक्षपदी अमोल राठोड यांची नियुक्ती झाली. १ डिसेंबर रोजी सारखणी येथे त्यांना जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांनी नियुक्तीपत्र दिले. तालुका उपाध्यक्षपदी अर्जुन जाधव, शहर सचिवपदी गणेश कर्णेवार यांचा समावेश आहे. यावेळी माहुरचे प्रवीण जाधव, सागर कण्णव, प्रसाद भंडारे, इलियास चौधरी, नागेश मंत्रीवार, नरेंद्र राठोड, नारायण पवार आदी उपस्थित होते.
शीरसाठ राष्ट्रवादीत
लोहा - लोहा तालुक्यातील मोहनराव शीरसाठ यांनी राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश केला. पक्षाच्या मुख्य कार्यालयात प्रवेश सोहळा झाला. यावेळी दिगंबर पेटकर, दत्ता कारामुंगे, अच्युत मेटकर, अंगद केंद्रे, विशाल गायकवाड आदी उपस्थित होते.
शिक्षणाधिकाऱ्यांची भेट
देगलूर - जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी खानापूर जि.प. शाळेला भेट देऊन पाहणी केली. या शाळेत ९ वी व १०वीचा वर्ग सुरू आहे. मुख्याध्यापक बालाजी पडलवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अनिल पाटील खानापूरकर, अशोक अमृते, गुज्जरवाड, सुत्रावे, साळुंके, कबीर, पाटील, कदम, श्रीरामे, काजळे आदी उपस्थित होते.
कुस्त्यांचा फड रद्द
नायगाव बाजार - कार्तिकी पौर्णिमेनिमित्त कोलंबी येथे दरवर्षी यात्रा व कुस्त्यांचा फड भरविला जातो. तथापि कोरोनामुळे यंदा कुस्त्यांचा फड रद्द करण्यात आला. परंपरेप्रमाणे ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद वाटप व चातुर्मास समाप्ती करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
दिव्यांगांचा निधी द्या
मुखेड - मुखेड तालुक्यातील दिव्यांगांना गेल्या अनेक महिन्यांपासून निधी मिळाला नाही. याशिवाय तालुक्यातील निराधार, अपंग, श्रावणबाळ, इंदिरा गांधी आवास योजनेतील दिव्यांगही निधीपासून वंचित आहेत. या संबंधित तहसीलदार काशीनाथ पाटील यांना निवेदन देण्यात आले.
मुनेश्वर यांची निवड
किनवट - राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी किनवट तालुक्यातील विश्वदीप मुनेश्वर यांची निवड झाली. कार्याध्यक्ष सचिन तडवी, उपाध्यक्ष माळोदे, तर सचिवपदी साळुंके यांची निवड झाली. यावेळी संजय पवार, महेश रोकडे, महेश माने आदी उपस्थित होते.
भोकर येथे दारू जप्त
भोकर - येथील एका बिअर शॉपीजवळ अवैध दारू बाळगणाऱ्यास पोलिसांनी १ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. पो.ना. प्रकाश श्रीरामे यांनी ही कारवाई केली असून ४ हजार २९० रुपयांची अवैध देशी दारू जप्त केली.भोकर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.