विकासाची धमक काँग्रेसमध्येच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:53 AM2019-03-04T00:53:05+5:302019-03-04T00:54:01+5:30
जेएनएनयुआरएम व गुरू-त्ता-गद्दीच्या माध्यमातून नांदेडचा मोठा विकास झाला. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नांदेडलगत असलेल्या दोन्ही तरोड्यांचा मनपात समावेश केला.
नांदेड : जेएनएनयुआरएम व गुरू-त्ता-गद्दीच्या माध्यमातून नांदेडचा मोठा विकास झाला. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नांदेडलगत असलेल्या दोन्ही तरोड्यांचा मनपात समावेश केला. एवढेच नव्हे, तर या भागाच्या विकासासाठी जेएनएनयुआरएमचा दुसरा टप्पा मंजूर करून घेतला. त्यामुळे दोन्ही तरोडा व सांगवी भागात मोठे रस्ते निर्माण झाले. त्यासोबतच ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या भागाचा आणखी विकास होण्यासाठी दोन्ही तरोड्यांचा विकास आराखडा तयार करणे गरजेचे असून नांदेड शहराचा विकास करण्याची धमक केवळ काँग्रेस पक्षातच असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी रविवारी येथे केले.
तरोडा भागातील तरोडा खु., तरोडा बु. व सांगवी या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. खा. चव्हाण म्हणाले की, तरोड्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपले कायम लक्ष राहिले आहे. या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवितानाच इतर पायाभूत सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या परिसरातील ज्या भागात कॅनॉल होता तेथे कॅनॉलमुळे डासांचे साम्राज्य निर्माण झाले होते मात्र मनपाच्या माध्यमातून मोठा चौपदरी रस्ता तयार करण्यात आला. आता हा परिसर वेगाने विकसित होत असून या रस्त्यावर सिनेमा थिएटर, मॉल यासह पंचतारांकित वसाहती निर्माण झाल्या आहेत. भविष्यातही तरोड्याच्या विकासासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही. आपली साथ मात्र काँग्रेस पक्षाला भक्कमपणे द्या. थापा देणाऱ्या सेना-भाजपाला बळी पडू नका असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी पालकमंंत्री आ. डी. पी.सावंत, महापौर शीला भवरे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, उपमहापौर विनय गिरडे, सभापती फारूखअली खान, सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, विरोधी पक्षनेत्या गुरूप्रितकौर सोडी, संजय लहानकर, प्रवक्ते संतोष पांडागळे, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, उमेश पवळे, नगरसेवक सतीश देशमुख, संगीता तुप्पेकर, कविता मुळे, ज्योती कदम, सुनंदा पाटील, जयश्री पावडे,ज्योती कल्याणकर, दीपक राऊत, संदीप गाडीवाले, कौशल्या पुरी, करूणा कोकाटे, मंगेश कदम, पप्पू कोंढेकर, धम्मा कदम, संतोष मुळे आदींची उपस्थिती होती.
नांदेड अभेद्य गड
मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी नांदेडमध्ये येवून काँग्रेसला हरविण्याची भाषा केली. अशाच वल्गना त्यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावेळीही केल्या होत्या. प्रत्यक्षात नांदेडकरांनी भाजपासह विरोधकांना धोबीपछाड दिली. येणा-या लोकसभा निवडणुकीतही नांदेडकर काँग्रेसच्याच पाठीशी ठामपणे उभे राहिलेले दिसतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.