भारत दाढेल।नांदेड : वेदना उराशी, दु:ख पायथ्याला, हेच जगणे आहे, एवढेच ठावे मला़़़ अगदी असेच जीवन जगणाऱ्या दोन दिव्यांग बंधुंनी आपल्या वेदनेवर मात करीत आपल्या वृद्ध आई, वडिलांचा सांभाळ करण्यासाठी गिरणी व किराणा दुकानाच्या माध्यमातून आयुष्याशी दोन हात केले आहेत़ आज या दोन्ही भावांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाचीही उभारणी केली आहे़तरोडा खु़ भागातील मालेगावरोडवर जैनमंदिराजवळ किरायाच्या जागेत गिरणी व किराणा दुकान थाटून कुटुंबाचा भार उचलणा-या दिव्यांग बंधुंचा जीवनप्रवास अत्यंत वेदनादायी आहे़ शारीरिक वेदना सहन करीत या दोन्ही दिव्यांग बंधुंनी आपल्या व्यवसायात प्रगती करून दाखवली आहे़ मनोज किशोरराव पिंपळे (वय ३५) व गजानन पिंपळे (वय ३१) हे दोघे सख्खे भाऊ़ गजानन पिंपळे हे जन्मत:च दिव्यांग आहेत़ त्यांना दोन्ही पायाने चालता येत नाही़ तर मनोज यांना वयाच्या १३ व्या वर्षी पाठीच्या कण्याचा आजार झाला आणि त्यानंतर हळूहळू कमरेपासून खाली त्यांचे शरीर कमजोर झाले़ मानेपर्यंत आखडून गेल्यामुळे त्यांना हालचाल करता येत नाही़ त्यामुळे एका जागेवरच बसून ते दुकानाचे काम पहातात़ तर लहान बंधू गजानन यांनाही कमरेखाली मोठे छिद्र पडल्यामुळे त्यांचे आॅपरेशन करणे गरजेचे आहे़ या दोन्ही भावांचे दिव्यांगत्व आणि त्यात मोठे आजार सोबत घेवून हे दोन्ही बंधू आपल्या आईवडिलांचा सांभाळ करतात़ मोठ्या भावाच्या उपचारासाठी मोठा खर्च लागणार आहे़़ आर्थिक परिस्थती नाजूक असल्याने हा खर्च त्यांना परवडणारा नाही़ अशाही परिस्थितीत दर महिन्याला मनोज यांच्या औषधांसाठी दहा हजार खर्च करावे लागतात़ महिन्याकाठी गिरणी व किराणा दुकानात मिळणाºया पैशातून जागेचा किराया व औषधींसाठी खर्च होतो़ वडील किशोरराव पिंपळे व आई मंगलाबाई यांनी सांगितले की, मुलांनी जिद्दीने व्यवसाय चालवून पोटाचा प्रश्न सोडविला. मात्र मुलांना अपंगत्वाचे प्रमाणपत्रही कमी टक्के देण्यात आले आहे़ त्यामुळे शासनाच्या योजनाही मिळत नाहीत़
वेदनेशी मैत्री करीत दिव्यांगांनी केली आयुष्याची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:22 AM