लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : महाराष्ट्र बसस्थानक दुरूस्ती बांधकाम निकृष्ट दर्जाचे अन् तेही संथगतीने होत असल्याने त्या ठिकाणी थांबण्यास, ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. जुन्या इमारतीवर बांधकाम होत असल्याने भविष्यात ते कोसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे.धर्माबाद बसस्थानक दुरूस्ती व बांधकामासाठी ६० लाख व समोर पंटागणात मजबुती, डांबरीकरण, रस्त्यासाठी ४० लाख असे एकूण १ कोटी रुपयांचा निधी तीन वर्षांपूर्वीच मंजूर झाला. दोन वर्षानंतर सन २०१८ जानेवारीमध्ये दुरूस्ती व बांधकामाला सुरूवात झाली. आज दहा महिने उलटले तरीही बांधकाम पूर्ण झाले नाही. संथगतीने होत आहे. तेही जुन्या बसस्थानकाचे पत्र (टिन) काढले. जुने अँगल तसेच ठेवून त्यावर केवळ नवीन टिन बसवून बाजूला असलेल्या इमारतीच्या जुन्या भिंतीवर दुसरी मजली म्हणून बांधकाम करण्यात येत आहे. जुन्या भिंतीवर बांधकाम करीत असल्याने भविष्यात ते कोसळण्याची भीती निर्माण होत आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असून ते मातीमिश्रीत आहे़ तसेच बसस्थानकाच्या पटांगणात केवळ गिट्टी टाकली असून डांबरीकरणाचा अद्याप बेपत्ता आहे. साठ लाखांचे काम व चाळीस लाखांचे काम केवळ दहा ते पंधरा लाखांत गुंडाळण्याचा प्रकार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. दहा महिने उलटले तरीही कामाने गती घेतली नसून संथगतीने अन् तेही निष्कृष्ट दर्जाचे होत आहे.सुविधांचा अभावधर्माबाद येथील नवीन बसस्थानक सन १९९२ साली बांधले असून २५ वर्षानंतर दुरूस्तीसाठी फंड मिळाला़ दरम्यान, येथील बसस्थानक ओसाड बनले होते. याठिकाणी कोणतीच सुविधा नसून पिण्याचे पाणी, शौचालयाचा अभाव, पंखे बंद, रात्रीला लाईट नाही़ खिडक्या, दारे तुटलेले, आजूबाजूला झुडपे वाढलेले, अस्वच्छता या कारणांमुळे प्रवासी इकडे फिरकत नव्हते़दुरूस्तीचे कामे थातूरमातूर
- पंचवीस वर्षानंतर एक कोटीचा निधी मिळाला़ तेही इस्टीमेटनुसार कामे होत नसून थातूरमातूर करण्यात येत आहे. एसटी महामंडळाचे बांधकाम विभाग व गुत्तेदार यांच्या मनमानी कारभारामुळे भविष्यात इमारत धोकादायक ठरणार असून काही घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा सवाल प्रवासी वर्गातून केला जात आहे. दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान झाले आहे़