धर्माबाद नगरपालिका; ४६ ठरावांना१२ नगरसेवकांची नापसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:37 AM2019-01-07T00:37:55+5:302019-01-07T00:38:41+5:30
येथील नगरपालिकेत ३ जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकूण ४६ विषयाला १२ नगरसेवक नापसंती दर्शवून सभागृहाबाहेर पडले़ त्यावेळी नगराध्यक्षांनी सभा तहकूब केली.
धर्माबाद : येथील नगरपालिकेत ३ जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकूण ४६ विषयाला १२ नगरसेवक नापसंती दर्शवून सभागृहाबाहेर पडले़ त्यावेळी नगराध्यक्षांनी सभा तहकूब केली.
येथील नगरपालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा, काँग्रेसचे दोन, भाजपचे चार, बसपा एक, राजप एक व एक अपक्ष असे पक्षीय बलाबल असून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आलेला असून काँग्रेस पक्षांचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून कारभार काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा चालत असताना या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन्हीही पक्षांतील नगरसेवकांत उघडउघड फूट पडलेली दिसून आले.
३ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत बारा नगरसेवकांच्या प्रभागातील विषय विषयपत्रिकेत नसल्यामुळे व काही आर्थिक तडजोडीचे विषय नगराध्यक्षांनी ठेवलेले निदर्शनास आल्यामुळे १२ नगरसेवकांनी सर्व ४६ विषयांना नापसंती दर्शविली. तसेच सभागृहातून सभापती निलेश पाटील बाळापूरकर, नगरसेवक सुधाकर जाधव, श्यामराव गोणारकर, युनूस खान, भाजपाचे संजय पवार, साय्यारेड्डी गंगाधररोड, कविता बोल्लमवार, रूपाली पाटील बाळापूरकर, साधना सुरकूटवार, श्रीमती अफसरी बेगम, श्रीमती अहेमदीबेग, महादाबाई वाघमारे हे सभागृहा बाहेर पडले. शेवटी हा प्रकार पाहून नगराध्यक्षांनी सभा रद्द केली.
विविध पक्षांचे १२ नगरसेवक एकत्र येऊन पालिकेत एक गट तयार केलो. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, काँग्रेस दोन, भाजपा चार व अपक्ष दोन हे सर्व नगरसेवक आपल्या प्रभागाच्या विकासासाठी पक्षभेद दूर ठेऊन एकत्र आल्याचे सांगण्यात येत आहे़ गेल्या दोन वर्षांपासून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी मनमानी कारभार करीत असून काही मोजक्याच नगरसेवकांना विश्वासात घेऊन पालिकेचा कारभार करीत असल्याचा आरोप १२ नगरसेवकांनी केला आहे.
- या सभेत एकूण ४६ विषय ठेवण्यात आले़ त्यामध्ये सन १९६८ सालची जुनी पाईपलाईन असून बहुतांश ठिकाणी फुटलेली असल्याने पाणी वाया जाते़ त्यावर मात करण्यासाठी दुरूस्तीचा ठराव हायकोर्टाने दिलेला आदेश नानाभाऊ नगरपालिकेतील वारसांना नोकरीवर घेणे हा एक ठराव, पाणीटंचाई लक्षात घेऊन दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी रामनगर, इंदिरानगर व अन्य ठिकाणी पाण्याची टाकी उभारणे, पाण्याच्या टाकीजवळ पाणी वाया जाऊ नये म्हणून मशीन उभारणे, असे विविध विकासात्मक मुद्दे विषय ठेवण्यात आले होते. पण १२ नगरसेवकांनी सर्वच विषयाला नापसंती दर्शवून विरोध केला. विषयावर अभ्यास न करताच विकासकामाला विरोध करणे हे जनतेची सेवा न करणे होय, असे उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांनी सांगितले.
- धर्माबाद नगरपालिकेत नगराध्यक्षा अफजल बेगम अब्दुल सत्तार काँग्रेस पक्षाचा असून त्यांच्याच विरोधात सर्वसाधारण सभेत विषयाला दोन काँग्रेस नगरसेवकांनी विरोध केल्याने उघडउघड काँग्रेस पक्षांत फूट निर्माण झाली आहे. उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी राष्ट्रवादीचे असून राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी विरोध केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतसुद्धा फूट निर्माण झाली आहे.