स्वस्त धान्य दुकानदारांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही हा प्रश्न कायम आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झालेले आहेत. लहान-मोठी दुकाने बंद आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता कोणतेही दुकान सुरू नाही. गोरगरीब मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने गरीब कुटुंबीयांना स्वस्त धान्याची व्यवस्था केली आहे. परंतु सदोष यंत्रणेमुळे त्या धान्यापासूनही जनतेला मुकावे लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात रेशनच्या मालाचा मोठा आधार असतो. पण तेदेखील मिळत नसल्याने लाभार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सद्य:स्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यात एकूण पाच लाख ९२ हजार ११७ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यामध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारक ७९ हजार १३ तर एप्रिल - शेतकरी शिधापत्रिकाधारकांची संख्या ९१ हजार ६२८ एवढी आहे.
मकाही निकृष्ट दर्जाचा...
गतवर्षापासून धान्य दुकानातून लाभार्थ्यांना धान्यासोबत मका द्यायला सुरुवात केली आहे. परंतु, हा मका निकृष्ट दर्जाचा येत आहे. ही बाब पुरवठा विभागाच्या निदर्शनास आणून दिलेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे काही लाभार्थ्यांनी सांगितले. एकंदरीतच नांदेड शहरातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाचा मका दिला जात असल्याने, लाभार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.