नांदेड : जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला वेग आला असून, १८ वयोगटांपासून लसीकरण करण्यात येत आहे. अनेकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून, दुसरा डोस घेताना लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र अनेकांकडे नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.
जिल्ह्यात १०२ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. १८ ते ४४ वयोगटांसह ४५ वर्षांवरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोस उपलब्ध करून दिला जात आहे. मनपा क्षेत्रात १९, तर उपजिल्हा रुग्णालय तसेच सर्व ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध आहे. पहिली लस घेतल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने लसीकरणाचे प्रमाणपत्र उपलब्ध होते. मात्र अनेकांनी हे प्रमाणपत्र काढून घेतले नसल्याचे चित्र समोर येत आहे. दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना प्रमाणपत्राची मागणी केली जात आहे. मात्र प्रमाणपत्र नसल्याने परत फिरावे लागत आहे. प्रमाणपत्र असल्यास देशात कुठेही दुसरा डोस घेता येतो. मात्र प्रमाणपत्राअभावी पहिला डोस घेतला. त्याच ठिकाणी जावे लागत आहे.
मोबाईल नंबर कोणाचा हेच आठवत नाही
लसीकरणासाठी मोबाइल क्रमांक तसेच आधार क्रमांक आवश्यक आहे. मात्र अनेकांना दुसरा डोस घेण्यासाठी गेल्यावर पहिला डोस घेताना कोणता मोबाइल क्रमांक दिला हे लक्षात नसल्यानेही अडचणी येत आहेत. चुकीचा क्रमांकामुळे पहिल्या डोसची नोंद दाखवत नाही.
-विजय ऋषीपाठक, अष्टविनायकनगर
लसीकरण केंद्रावर आता लस उपलब्ध झाल्याने दुसऱ्या डोससाठी पोहोचला असता पहिल्या लसीच्या प्रमाणपत्राची मागणी केली. ते प्रमाणपत्र नसल्यामुळे ज्या ठिकाणी पहिला डोस घेतला तिथे जाण्याची सूचना करण्यात आली.
-शंकर केशटवार , आनंदनगर
लसीकरणावेळी ही
घ्या काळजी
n लसीकरण केंद्रावर गेल्यावर आपली नोंद व्यवस्थित व योग्यरीतीने होत आहे की नाही? हे पाहणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. दिलेला मोबाइल क्रमांक सुरू आहे का नाही? याची खात्री करावी.
n लस घेतल्यानंतर आपल्या मोबाइलवर संदेश प्राप्त होतो. आपल्याला मेसेज आल्यास लसीकरणाची नोंद झाल्याचे स्पष्ट होते.
नोंद होण्यासाठी काळजी घ्यावी
लसीकरण मोहिमेत लस घेतल्यानंतर प्रत्येकाची नोंद होणे आवश्यक आहे. यासाठी केंद्रावर गेल्यानंतर मोबाइल व आधार क्रमांकाची योग्य पद्धतीने नोंद करून घ्यावी. त्याचवेळी आपल्याला लसीकरणानंतर संदेश प्राप्त होतो की नाही? याबाबतही सजग रहावे.
- डॉ. बालाजी शिंदे
जिल्हा आरोग्य अधिकारी