- शरद वाघमारे
मालेगाव : पूर्व प्राथमिक शिक्षणात अनेकांचा इंग्रजी शिक्षणाकडे कल वाढत चालला असताना अंगणवाडीतच इंग्रजी शाळेच्या सुविधा पुरविल्या तर ही गळती थांबू शकते. या विचाराने सामाजिक बांधिलकीतून व लोकसहभागातून सभापती व सरपंच या पती-पत्नी दाम्पत्याने अर्धापूर तालुक्यातील पहिली अंगणवाडी डिजिटल करण्याचा पॅटर्न राबविला आहे.
कामठा (बु़) येथे पं.स सभापती मंगला स्वामी व त्यांचे पती कामठ्याचे सरपंच पिंटू स्वामी यांच्या प्रयत्नातून तीन अंगणवाडी डिजिटल झाल्या आहेत़ या अंगणवाड्या डिजिटल होण्यासाठी सभापती मंगला स्वामी यांनी लोकसहभागातून वर्गणी जमा करून अंगणवाडीसाठी लागणारे साहित्य खरेदी केले़ ग्राम पंचयातच्या चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत मार्फतही अंगणवाडीसाठी भिंतीवर चित्रे, इंग्रजी माध्यमाच्या शाळासारखी टेबल, खूर्ची, फर्निचर, एलईडी, ज्ञानरचनावादवर आधारित मुळाक्षरे उपलब्ध करून दिली आहेत़ कामठा बु़ येथे सद्यस्थितीत तीन अंगणवाडी केंद्र डिजिटल झाले आहेत़ त्यात मोगली, आकाशगंगा, रमाई अशी नावे या अंगणवाड्यांना देण्यात आली असून नावाला अनुरूप अशी चित्र ही अंगणवाड्यांच्या भिंतीवर बोलके आहेत.
अर्धापूर तालुक्यातील पहिली डिजिटल अंगणवाडीची सुरुवात कामठा बु़ येथून होत असून भोकर मतदारसंघाच्या आ. अमिताताई चव्हाण यांनी या डिजिटल अंगणवाडीचे उद्घाटन करून मिळणा-या शैक्षणिक सुविधे विषयी सभापती मंगला स्वामी व सरपंच पिंटू स्वामी यांचे व अंगणवाडी कार्यकर्ती व ग्रामस्थांचे कौतुक केले. अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी सुप्रिया पोवार, विस्तार अधिकारी शिवाजी जामुते, पर्यवेक्षिका रेणू देशपांडे, अंगणवाडी सेविका संगीता दासे, सुमनबाई कदम, योजना बरगळ, मदतनीस सुमन खंदारे आदींनी परिश्रम घेतले़
सर्वच अंगणवाड्या होणार डिजिटलअर्धापूर तालुक्यातील सर्वच अंगणवाडी केंद्र डिजिटल करण्यात येणार असून याची सुरुवात कामठा बु़ येथून करण्यात आली आहे़ १४ व्या वित्त आयोगातून अंगणवाडीसाठीचा खर्च सरपंच आणि ग्रामसेवक यांनी खर्च करावा याबाबत पंचायत समितीच्या बैठकीत ठराव घेण्यात आला आहे़- मंगला स्वामी, सभापती, पं.स अर्धापूर
अंगणवाडीतील प्रवेश वाढणारइंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाल्यांना प्रवेश देण्याचा नवा ट्रेंड झाला असून गावातील अंगणवाड्यांना सोयी सुविधा पुरविल्यास निश्चितच इंग्रजी माध्यमाच्या शाळेपेक्षा अंगणवाडीत प्रवेश वाढणार आहेत़ हाच उद्देश ठेवून गावातील सहकार्याकडे अंगणवाड्या डिजिटल करण्यात आल्या आहेत- पिंटू स्वामी, सरपंच, कामठा (बु़) ग्रामपंचायत
१५ अंगणवाडी केंद्र आयएसओअर्धापूर तालुक्यातील १५ अंगणवाडी केंद्र आयएसओ झाल्या असून पूर्व प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी गावातील प्रत्येक एक अंगणवाडी डिजिटल होणार आहे- सुप्रिया पोवार, बालविकास प्रकल्प अधिकारी, पं.स. अर्धापूर