नांदेड : दिव्यांग, गर्भवती महिला व कडेवर मूल असलेल्या महिलांना रांगेशिवाय सरळ मतदान केंद्रात प्रवेश देण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या. ८ एप्रिल रोजी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे दुसरे प्रशिक्षण पार पडले. यावेळी ते बोलत होते.शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात झालेल्या या शिबिरात डोंगरे यांनी पारदर्शक मतदान प्रक्रिया लोकशाहीबद्दलचा विश्वास द्विगुणित करते म्हणून प्रत्येक मतदान अधिकाऱ्यांनी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटची परिपूर्ण माहिती करुन घ्यावी. व्हीव्हीपॅटचा मतदान यंत्राशी कसा संबंध आहे, याचा सरावातून अभ्यास आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.यावेळी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनुराधा ढालकरी, जीवराज डापकर, प्रसाद कुलकर्णी, स्नेहलता स्वामी, विजयकुमार पाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक डापकर यांनी केले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ढालकरी यांनी मतदानपूर्व प्रक्रिया, मतदानाच्या दिवशी व पूर्वसंध्येला कोणत्या आवश्यक बाबी कराव्या लागतात याची माहिती दिली. यावेळी त्यांनी मतदान केंद्राध्यक्षाच्या डायरीचे महत्त्वही विशद केले.यावेळी निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शंका, अडचणीचे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून निरसन करण्यात आले. सूत्रसंचालन नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी केले. या प्रशिक्षणासाठी संजय भालके, राजेश कुलकर्णी, संजय कोठाळे, शमशोद्दीन, सर्व मंडळ अधिकारी, तलाठी आदींनी परिश्रम घेतले.