नांदेड : राज्याचे पाेलीस महासंचालक संजय पांडे यांनी पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आठवडाभरात काेणत्या समस्यांवर काय प्रगती झाली याचा संक्षिप्त लेखाजाेखा फेसबुकवर मांडला जाताे. त्यानुसार प्रत्यक्ष आदेश जारी करून त्याची अंमलबजावणी केली जाते. महासंचालक जे निर्णय जाहीर करतात त्याची तातडीने अंमलबजावणीही हाेते, असा विश्वास पाेलीस कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. रविवारी पाेलीस महासंचालक संजय पांडे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून राज्यभरातील पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या अनेक विषयांना हात घातला व त्याबाबतची स्थिती जाहीर केली. प्रत्येक पाेलीस कर्मचाऱ्याला किमान फाैजदारापर्यंत बढतीद्वारे नेण्याचा संकल्प महासंचालकांनी जाहीर केला. मुंबई, ठाणे व इतर शहरात पाेलिसांना शासकीय दरानुसार हक्काची १ हजार घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याची यादी महासंचालक आपल्या फेसबुकवरून जारी करतील. सेवाज्येष्ठतेनुसार ही घरे दिली जातील. सहाय्यक फाैजदारांना त्यात प्राधान्य राहील. मात्र, पुढील २० वर्षे हे घर विकता येणार नाही.
पाेलीस कर्मचाऱ्याला केल्या जाणाऱ्या दंडाची रक्कम १० टक्केपर्यंत मर्यादित करण्यात आली असून पुढील आठवड्यात त्याबाबतचे परिपत्रक जारी केले जाणार आहे. पाेलिसांच्या गृह कर्जाचा (डीजी लाेन) विषय तातडीने मार्गी लावला जाईल. साडेपाच टक्के व्याजदरानुसार हे कर्ज मिळवून देण्याचा महासंचालकांचा प्रयत्न आहे. त्यात यश न आल्यास पुढील आठवडयात गृह कर्जाचा निर्णय जारी केला जाणार आहे. जिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा बदलीवर साेडण्यासाठी सुरुवात झाली असून गडचिराेलीमध्ये काही कर्मचाऱ्यांना साेडले गेले आहे.
फाैजदार परीक्षेसाठी तीन संधी.......
पाेलीस उपनिरीक्षकांच्या पदाेन्नतीच्या प्रस्तावावर गृहमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. या पदाेन्नतीसाठी सर्वांचाच विचार करण्यात आला आहे. फाैजदार परीक्षेसाठी तीन संधी दिल्या जाणार असून त्याबाबतच्या परीक्षेची घाेषणा लवकरच केली जाणार आहे. पाेलीस माेटर परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनाही संधी देता येते का या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. राखीव पाेलीस उपनिरीक्षक, निरीक्षकांना एसपी पदापर्यंत पदाेन्नती देण्याचा विचार असून त्याबाबतचा प्रस्ताव पुढील आठवड्यात पाठविला जाणार आहे. राखीव पाेलीस उपनिरीक्षकांची ७० रिक्त पदे पुढील आठवडयात भरली जाणार आहेत. ३७ सहाय्यक पाेलीस उपनिरीक्षकांची थांबलेली पदाेन्नतीची प्रकरणे पुढील आठवड्यात मार्गी लावली जातील. जुलैमध्ये निवृत्त हाेणाऱ्यांना त्यात प्राधान्य दिले जाईल. प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयाेगानुसार २४ टक्के वाढीव भत्ता देण्याबाबत चर्चा केली जाईल. राज्य राखीव पाेलीस दलाच्या गट १४ ते १६ साठी प्रतिनियुक्तीबाबतचा निर्णय झाला असून पुढील आठवड्यात आदेश जारी हाेतील. गटबदलीबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.
चाैकट......
२६८ निरीक्षक पदाेन्नतीच्या कक्षेत....
राज्यातील २६८ पाेलीस निरीक्षक पदाेन्नतीच्या कक्षेत असून त्यांना उपअधीक्षक बनविले जाणार आहे. २ जुलै राेजी त्यांची यादी जारी करून वार्षिक गाेपनीय अहवाल मागण्यात आले आहेत.