नांदेड : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी १ नोव्हेंबर रोजी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीबाबत जि. प. अध्यक्षा मंगला गुंडिले यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब राठोड यांना खुलासा मागितला आहे. अशी बैठक घेण्याचे अधिकार उपाध्यक्षांना आहेत का व असले तर ते कोणत्या नियमाने आहेत याबाबतही त्यांनी विचारणा केली.जिल्हा परिषदेत १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता उपाध्यक्ष धोंडगे यांनी विभागप्रमुखांची बैठक घेवून विविध सूचना केल्या होत्या. त्यात जि. प. च्या उत्पन्नवाढीच्या प्रमुख विषयासह माळेगाव यात्रा तयारीचाही आढावा घेण्यात आला होता. या बैठकीचे रितसर पत्र अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंह राठोड यांच्या स्वाक्षरीने विभागप्रमुखांना दिले होते. या बैठकीस सर्व विभागप्रमुखांनी हजेरी लावून चर्चेत सहभाग नोंदवला होता. त्याचवेळी आता उपाध्यक्षांना अशी बैठक घेता येते काय अशी चर्चा जिल्हा परिषदेत सुरू होती. याबाबत खुद्द जि. प. अध्यक्षा मंगला गुंडिले यांनी नाराजी व्यक्त केली होती. इतकेच नव्हे, तर ३ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांना एक पत्र देवून त्या बैठकीबाबत खुलासा मागितला आहे. त्यात अशी बैठक झाली काय, बैठकीचे पत्र आपल्या स्वाक्षरीने काढले होते. जिल्हा परिषदेतील कोणत्याही बैठकीचे पत्र हे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढावे की अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी काढावे, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य हे दोघेही असताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्यांना पत्र काढण्याचे अधिकार कुणी प्रदान केले? आदी बाबींची विचारणा करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर जि. प.च्या अध्यक्षा अनुसूचित जातीच्या असल्याने अध्यक्षांचे संपूर्ण अधिकार उपाध्यक्षांना देण्याची कायद्यात तरतूद आहे काय आणि आपण अनुसूचित जातीची महिला अध्यक्ष आहे म्हणून आपण जातीय द्वेषातून असे कृत्य केलात काय, अशी विचारणाही करण्यात आली आहे. या पत्राचा दोन दिवसांत खुलासा करावा असे अध्यक्षा गुंडिले यांनी स्पष्ट केले आहे. खुलासा न केल्यास कारवाई करण्याबाबतही इशारा दिला आहे. /(प्रतिनिधी)
■ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी मात्र या बाबीला फारसे महत्व देत नसल्याचे सांगताना येत्या आठवड्यात बीओटीसंदर्भात स्वतंत्र बैठक आपण आयोजित करणार असल्याचे सांगितले.> जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी बोओटी प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्राही जवळ आली आहे. या यात्रेच्या तयारीसाठी पाठपुरावा आवश्यक असल्याचे ते म्हणाले.