नांदेड-महाविकास आघाडीच्या बैठकीत लाेकसभेच्या जागा वाटपाचे सूत्र ठरले असून त्यात काँग्रेसला सर्वात कमी जागा देण्याबाबत जी काही चर्चा सुरु आहे. ती सर्व निरर्थक अन् अवास्तव आहे. प्रत्यक्षात जागा वाटपासंदर्भात चर्चेला अद्याप सुरुवातच झाली नाही. त्यामुळे या चर्चेला कोणताही आधार नाही, असे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी स्पष्ट केले.
आज चव्हाण नांदेडात आलेले असताना माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीची बैठक झाली. परंतु त्यामध्ये जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे निश्चितच कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकच्या ज्या-ज्या भागातून गेली. त्या भागात काँग्रेसला चांगले यश मिळाले हे सिद्ध झाले आहे. राहूल गांधी यांचा नागरीकांशी थेट संवाद आणि संपर्क यामुळे त्यांच्याबद्दलचे आकर्षण वाढले आहे. त्याचा परिणाम कर्नाटकात दिसून आला. त्यांच्या या पदयात्रेचा देशातील इतर राज्यांमध्येही निश्चितच फायदा होणार आहे. परंतु त्यासाठी स्थानिक नेतृत्वानेही मेहनत घेण्याची गरज आहे. नेते म्हणून राहूल गांधी हे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. परंतु सर्वच ओझे त्यांच्या खांद्यावर टाकून चालणार नाही. असेही चव्हाण म्हणाले.
राजकीय फायद्यासाठी जातीय तेढत्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेबाबत माध्यमात जे आले त्यावरुन त्या ठिकाणी परंपरा, प्रथा आहे का? यावर चर्चा सुरु असल्याचे दिसते. परंतु विनाकारण ही घटना मोठी करुन दाखविली जात आहे. राजकीय फायद्यासाठी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो अत्यंत चुकीचा आहे. शिर्डीमध्ये सर्वच समाजाचे भाविक येतात असेही चव्हाण म्हणाले.