नांदेड : जिल्ह्यात विविध गुन्हे केल्यापासून हाती न लागलेल्या, न्यायालयात जामीन मिळवून फरार झालेल्या तब्बल १३१९ आराेपी व क्रियाशील गुंडांच्या अटकेचे आव्हान जिल्हा पाेलीस दलापुढे आहे. या आराेपींच्या अटकेसाठी पाेलीस प्रशासनाकडून सातत्याने वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जातात. परंतु त्यानंतरही अनेक आराेपी पाेलिसांच्या जाळ्यात अडकत नाहीत. पर्यायाने त्यांची नाेंद वर्षानुवर्षे पाेलीस दप्तरी ‘पाहिजे-फरारी’च्या यादीत पाहायला मिळते. नांदेड जिल्ह्याला लागून तेलंगणा व पुढे आंध्रप्रदेश राज्याची सीमा आहे. त्याचाच फायदा अनेक गुन्हेगार उचलतात. पूर्वनियाेजितपणे गुन्हा करून ते परप्रांतात फरार हाेतात. अनेक गंभीर व गाजलेल्या गुन्ह्यातील आराेपी हा मार्ग शाेधतात. त्यामुळे पाेलिसांना अनेकदा त्यांच्या अटकेशिवाय न्यायालयात सदर गुन्ह्यातील दाेषाराेपपत्र सादर करावे लागते. अशा प्रकरणात आराेपीच्या अटकेनंतर पुरवणी दाेषाराेपपत्र सादर करण्याची तजवीज ठेवली जाते.
आजच्या घडीला जिल्ह्यातील पाेलिसांना तब्बल १३१९ आराेपी हवे आहेत. त्यातील १२४ आराेपी न्यायालयात जामीन मिळाल्यानंतर पुन्हा तारखेवर हजर झाले नाहीत. त्यांची नाेंद फरार आराेपींच्या यादीत करण्यात आली आहे. आराेपी हजर व्हावेत म्हणून त्यांचा जामीन घेणाऱ्यांना दंड ठाेठावला गेला. अनामत रक्कम जप्त केली गेली. मात्र, त्यानंतरही अनेक आराेपी सापडत नाहीत. अशा गुन्ह्यातील बहुतांश आराेपी हे परप्रांतीय असून भादंविच्या ३०४ (अ) कलमान्वये दाखल अपघाताच्या गुन्ह्यातील आहेत. ट्रक व इतर जडवाहनांचे चालक असलेल्या या आराेपींच्या अटकेसाठी पाेलिसांनी अनेकदा आपली पथके इतर राज्यांमध्ये पाठविली. वाहन मालकांच्या माध्यमातून त्यांना शाेधण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांचा थांगपत्ता लागला नाही.
गाव-वस्त्यांमध्ये खबरे पेरले..
सर्वाधिक ११९५ आराेपी हे विविध गुन्हे घडल्यापासून फरार आहेत. त्यांनी आपले माेबाइल नंबर बदलल्याने त्यांचे लाेकेशन शाेधणेही पाेलिसांना अवघड झाले आहे. अशा आराेपींच्या अटकेसाठी पाेलिसांनी त्यांच्या रहिवाशी गावे व वस्त्यांमध्ये आपले खबरे पेरले आहेत. ताे घरी कधी येताे का, घरच्यांशी काेणत्या क्रमांकावरून संपर्क करताे, त्याचे नक्की लाेकेशन काेठे आहे, कुण्या नातेवाइकांकडे आश्रयाला आहे याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न पाेलीस करत आहेत. अनेक ठिकाणी पाेलीस पाटलांचीही मदत घेतली जात आहे. गंभीर गुन्ह्यातील ‘वाॅन्टेड’ आराेपींची पत्रकेही रेल्वेस्टेशन, बसस्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी लावली जातात. अशा आराेपींच्या शाेधासाठी पाेलिसांकडून वारंवार विशेष माेहीम, काेंबिंग ऑपरेशन राबविले जाते.
फरार आराेपींपासून धाेका अधिक...
गुन्हा घडल्यापासून फरार असलेल्या या आराेपींची अटक सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची असते. कारण हे आराेपी घडलेल्या गुन्ह्यातील पंचसाक्षीदारांना धाेका पाेहाेचविण्याची, इतर गंभीर गुन्हे करण्याची शक्यता अधिक असते. गुन्ह्याच्या पद्धतीवरूनही (माेडस ऑपरेंडी) पाेलीस या आराेपींचा शाेध घेण्याचा प्रयत्न करतात. या आराेपींचा शाेध घेण्याचे आव्हान जिल्हाभरातील ठाणेदारांसह स्थानिक गुन्हे शाखेपुढे आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला यश....
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी जिल्हा पाेलीस अधीक्षक जिल्हा पाेलीस अधीक्षक प्रमाेद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात गेल्या काही महिन्यांत विशेष माेहीम राबविली. त्यात न्यायालयातून जामीन घेऊन फरार झालेले नऊ तर गुन्हा घडल्यापासून फरार असलेले १३२ अशा १४१ जणांना अटक केली.
काेट.....
‘विहीत मुदतीत दाेषाराेपपत्र दाखल करावे लागत असल्याने त्या वेळेपर्यंत न सापडलेल्या आराेपींची नाेंद सर्रास पाहिजेतच्या यादीत केली जाते. त्यामुळे हा आकडा वाढलेला दिसताेय. त्यातही अपघातातील वाहनचालकांची संख्या अधिक आहे. बांग्लादेशी कारागिरांचा आकडाही माेठा आहे. या पाहिजे-फरारीत आराेपींच्या शाेधार्थ सतत माेहीम राबविली जाते.’
प्रमाेद शेवाळे
जिल्हा पाेलीस अधीक्षक
नांदेड.