नांदेड : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या दिवशीच काँग्रेसने डीपीडीसीची बैठक ठेवल्याचा आरोप करीत चिखलीकर समर्थकांनी टीका केली होती़ तसेच डीपीडीसी बैठकीवर बहिष्कार टाकण्याची चर्चाही करण्यात आली होती़ परंतु सोमवारी झालेल्या बैठकीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर वगळता सर्व आमदार या बैठकीला उपस्थित राहिले़ मात्र फडणवीस यांचे आगमन होत असल्याचे समजताच सर्व जण विमानतळावर पोहोचले़ या ठिकाणी बैठकीत उपस्थित राहण्याच्या विषयावरुन खासदार आणि आमदारांमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे़ त्यामुळे भाजपातील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे़
२७ जानेवारी रोजी माजी मुख्यमंत्री फडणवीस हे नांदेड दौऱ्यावर येत असल्यामुळेच काँग्रेसने त्याच दिवशी जिल्हा नियोजन समितीची बैठक ठेवली़ पूर्वनियोजित दौऱ्याची कल्पना देवूनही ही बैठक ठेवण्यात आली़ पहिल्याच डीपीडीसी बैठकीसाठी खासदार, आमदार यांना उपस्थित राहता येवू नये, अशी व्यवस्था काँग्रेसने केली आहे़, असा आरोप खा. चिखलीकर समर्थकांकडून करण्यात आला होता़ तर या आरोपाचा काँग्रेसनेही चांगलाच समाचार घेतला होता़
दरम्यान, सोमवारी होणाऱ्या बैठकीला भाजपाचे खासदार, आमदार हे अनुपस्थित राहतील अशी दाट शक्यता होती़ परंतु सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास बैठकीला सुुरुवात होण्यापूर्वीच खा़ प्रताप पाटील चिखलीकर वगळता भाजपाचे आ़तुषार राठोड, आ़राजेश पवार, आ़राम पाटील रातोळीकर आणि आ़भीमराव केराम हे सभागृहात उपस्थित राहिले़ सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्याचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला़ दुपारी दीड वाजेच्या सुमारास फडणवीस हे विमानतळावर आले़ त्यावेळी सभागृहात उपस्थित असलेले हे आमदार स्वागतासाठी विमानतळावर पोहोचले होते़ या ठिकाणी बैठकीत उपस्थित राहण्याच्या विषयावरुन आमदार आणि खासदारामध्ये वाद झाल्याची चर्चा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांतच सुरू होती़