उपाध्यक्षपदी राम पाटील
लोहा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी राम पाटील पवार यांची नियुक्ती तालुकाध्यक्ष संजय पाटील कऱ्हाळे यांनी केली. या निवडीचे अनेकांनी स्वागत केले. पक्षाच्या वाढीसाठी आपण प्रयत्नशील राहू असे राम पाटील पवार यानिमित्ताने म्हणाले.
चेअरमनपदी बालाजी पवार
नायगाव - तालुका सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी गोळेगावचे सरपंच बालाजी पवार यांची निवड झाली. या निवडीची घोषणा माजी आ.वसंतराव चव्हाण यांनी केली. कार्यक्रमास बाजार समितीचे उपसभापती मोहनराव पाटील, तालुका संघाचे अध्यक्ष श्रीनिवास चव्हाण, चेअरमन प्रदीप कल्याण उपस्थित होते. या निवडीबद्दल पवार यांचे अनेकांनी स्वागत केले.
१८ हजारांची अवैध दारू जप्त
माळाकोळी - येथील एका हॉटेलमधून विनापरवाना दारूची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून १८ हजार १२० रुपयांची अवैध दारू जप्त केली. पोलीस कर्मचारी विवेक इश्वर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
कुरे यांचा सत्कार
उमरी - मुदखेड येथील रहिवासी तथा राहुरी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.श्रीनिवास कुरे यांना अहमदनगर महापालिकेच्या उपायुक्तपदी पदोन्नती मिळाली. अगदी अलीकडे त्यांनी उमरी येथे भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोज सावंत, डॉ. एम. एन. चंदापुरे आदी उपस्थित होते.
बससेवेची मागणी
उमरी - बोथी-तुराटी-सावरगाव मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी आगारप्रमुखांकडे केली आहे. यावेळी व्यंकटराव सोनटक्के, मालोजीराव वाघमारे, संजय वाघमारे, मारोती भालेराव, त्रिशला रिंगनमोडे, किशोर कवडीकर, उद्धव शेळके, गजानन गायकवाड, वंदनाताई पोतरे, अर्चना वाडेकर आदी उपस्थित होते.
महादेव मंदिरातील घंटा लंपास
उमरी - तालुक्यातील जांबगाव खारी येथील महादेव मंदिरातील ११ किलो वजनाची पितळी तांब्याची घंटा चोरट्यांनी लांबविली. उमरी पोलिसांनी बालाजी सावंत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविला. तपास सुरू आहे.
अध्यक्षपदी विजया गोडघासे
नांदेड - वात्सल्यनगर सोसायटी सिडको येथील विजया गोडघासे यांची भाजप सिडको हडको महिला मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख यांनी ही निवड केली. या निवडीबद्दल गोडघासे यांचे अनेकांनी स्वागत केले.
पोस्टमन महंमद अहमद सेवानिवृत्त
कुंडलवाडी- येथील पोस्टमन महंमद अहमद मोहीयोद्दीन सेवानिवृत्त झाल्याने जिल्हा डाक सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी सुभाषराव गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद देऊळकर, प्रकाश जाधव, हणमंत जामनोर, आय. जी. पठाण, सुरेश रोडेवार, गंगाधर भिलवंडे, माजीद नांदेडकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.