रविवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कक्षात मतमोजणी करण्यात आली. अर्धापूर सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून गोविंदराव शिंदे-नागेलीकर एका मताने निवडून आले. त्यांना १८, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाप्रणीत पॅनलचे गांधीजी पवार यांना १७ मते मिळाली. अर्धापूर मतदारसंघातून बाबूराव कदम विजयी झाले. त्यांना २३, तर त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. लक्ष्मण इंगोले यांना एक मत पडले. कंधार सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून प्रवीण पाटील-चिखलीकर यांनी १६, तर त्यांचे प्रतिस्पर्धी माधवराव पांडागळे यांना ८ मते मिळाली.
लोहा सहकारी संस्था मतदारसंघातून भाजपाचे खा. तथा पॅनलप्रमुख प्रतापराव पाटील-चिखलीकर यांना ४२ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी ललिताबाई सूर्यवंशी यांना ६ जागावर समाधान मानावे लागले. नायगाव सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांना २८ मते मिळाली. देगलूर मतदारसंघातून विजयसिंह देशमुख यांनी ३४, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी गोदावरीबाई सुगावे यांना २९ मते मिळाली.
धर्माबाद सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शाम कदम विजयी झाले. त्यांना ४, तर त्यांचे प्रतिस्पर्धी गफारबेग मिर्झा यांना एक मत मिळाले.
उमरी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून कैलास देशमुख यांना २५, तर महाविकास आघाडीचे संदीप कवळे यांना २१ मते मिळाली. मुखेड सेवा सहकारी मतदारसंघातून माजी आ. हणमंतराव पाटील यांना १७, तर त्यांचे प्रतिस्पर्धी गंगाधर राठोड यांना १६ मते मिळाली. किनवटमध्ये दिनकर दहीफळे २६ मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे सुरेश रंगनेनवार यांना १६ मते मिळाली. माहूरमधून राजेंद्र केशवे विजयी झाले. त्यांना १३, तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष बंडू भुसारे यांना ७ मते मिळाली.
सेवा सहकारी संस्था नांदेड मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या संगीता पावडे विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी डॉ. शीला कदम यांचा पराभव केला. पावडे यांना ५३७, तर प्रतिस्पर्धी डॉ. शीला कदम यांना ३७६ मते मिळाली. हिमायतनगर महिला राखीव मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या विजयाबाई शिंदे यांना ५९०, तर प्रतिस्पर्धी अनुराधा पाटील यांना ३१९ मते मिळाली.
नागरी सहकारी बँक पतसंस्था मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवराम लुटे १०५ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी दिलीप कंदकुर्ते यांचा पराभव केला. सहकारी संस्था मतदारसंघात मोहन पाटील टाकळीकर (१७८ मते), अनुसूचित जाती मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सविता मुसळे (५६६ मते), इतर मागासवर्गीय मतदारसंघातून महाविकास आघाडीचे हरीहरराव भोसीकर (७०७), भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून महाविकास आघाडीचे व्यंकटराव आळणे (६३९ मते) घेऊन विजयी झाले.
निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक १३, राष्ट्रवादी काँग्रेसने ३, तर शिवसेनेचे १ जागा, भाजपाप्रणीत पॅनलला ४ जागांवर समाधान मानावे लागले.