या कारवाईदरम्यानच जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना नांदेड तालुक्यातीलच थुगाव आणि पिंपळगाव कोरका येथेही अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. उपविभागीय अधिकारी डॉ. लतीफ पठाण यांच्यासह जिल्हाधिकारी गोदावरी पात्रात पोहोचले. तेथे थुगाव येथे वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे जेसीबी, १ ट्रक आणि १ सक्क्षन पंपही जप्त करण्यात आला. पिंपळगाव कोरका येथेही एक पोकलेन मशीन जप्त करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती. या कारवाईत मंडळ अधिकारी अनिरुध्द जोंधळे, तलाठी सचिन नरवाडे, सय्यद मोहसीन, उमाकांत भांगे, आकाश कांबळे, नारायण गाडे आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात वाळू माफियांवरील कारवाईत खुद्द जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे सरसावले आहेत. एकीकडे जिल्ह्यात वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने सुरू असताना, वाळू माफियांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. ऐन संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही कारवाई वाळू माफियांवर संक्रांत आणणारीच ठरली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले.